नमस्कार

      मी मागे एका कृषी महाविद्यालयातील विद्यार्थींशी खास संवाद साधण्यासाठी गेलो होतो. त्याचवेळेस मी त्यांना म्हंटलं की, ‘तुम्ही अनेक छोट्या-मोठ्या गावातून आला असाल तेव्हा गांवाविषयी, गावच्या वैशिष्ट्यांविषयी, गावातल्या अडीअडचणी, समस्यांविषयी मला सांगा.’ मुलं एकतर १७-१८ वर्षाची होती आणि त्यातूनही आपल्या गावाविषयी काय बोलावं ? काय सांगवं ? याचं ज्ञान व अंदाज त्यांना येत नव्हता हे माझ्या लक्षात आलं.

      आपल्याला आपल्या गांवाविषयी अभिमान वाटला पाहिजे. आपण जरा विचार केला तर एक बाब लक्षात येते की, प्रत्येक गावाचं आपलं म्हणून एक वैशिष्ट्य असतं. काही चांगल्या गोष्टी तर काही चांगल्या नसलेल्या बाबी प्रत्येक गावात असतात. ती चांगली गोष्ट कोणती ? हे गाववाल्यांनी लक्षात घ्यायला हवं. तसंच वाईट गोष्ट कोणती हे ही जाणीवपूर्वक पहायला हवं. पूर्वीची माणसं कसही असो पण ‘आपलं गांव’ या जाणीवेनं गावातच रहात होती. पण आजकालचा तरुण, आहे त्यात समाधान न मानणारा आहे. अर्थात त्याचं हे बरोबरच आहे. कारण ‘ठेवीले अनंत तैसेची रहावे’ ही भावना आजच्या तरुणाला उत्कर्षापासून, विकासापासून दूर ठेवते. बघा ना पूर्वी आपले आजोबा किंवा गावातील बुजुर्ग मंडळी सांगायची की, ‘अंथरून पाहून पाय पसरावे.’ त्यांची ही गोष्ट तशी खरीच. कारण कर्ज काढून, आमदनी आठअणे आणि खर्च रुपया हि वृत्ती तुम्हाला रसातळाला नेते. पण मला वाटतं, काळ बदलला, जगण्याचे संदर्भ बदलले, नवा विचार, नवी आशा, नाविण्याचा शोध, भौतिकतेला आलेलं महत्त्व यामुळे अंथरून पाहून पाय पसरण्यापेक्षा थोडंसं अंथरूनच मोठं केलं तर ? म्हणजे मग पाय पोटाशी घेऊन, शरीराचं मुटकुळं करून अंथरूणाच्या आतच पाय घेऊन झोपण्याची कसरत कां करावी ? असं अडचणीचं झोपल्याने झोप कशी लागणार ना ? म्हणून अंथरून मोठं करायला हवं असा जर हि तरुण पिढी विचार करत असेल तर त्यात त्यांचं चुकतय असं वाटत नाही. अर्थात मोठं अंथरून करून, शांत, चिंतारहित झोप घ्यायाची असेल तर त्यासाठी प्रमाणिक कष्ट करणं, शॉर्ट कट न मारता मोठा जरी असला तरी शाश्वत असलेला रस्ता हिमतीनं पार करणं या गोष्टी या तरुण पिढीनं अंगीकारल्या पाहिजेत. नाही का !

      हो तर मी सांगत होतो स्वत:च्या गांवाविषयी तरुणांना प्रेम हवं म्हणून. मंडळी तुमच्या मनात गावाविषयी आस्था असेल, प्रेम असेल, गावाचा अभिमान असेल तर गांव सुधारायला फार वेळ लागत नाही बरं का ! मी त्या कृषी माहाविद्यालयातील विद्यार्थांना म्हंटलं, ‘पोरांनो आता बघा, उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा गांव फटाखेच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. केम कुंकवासाठी, अक्कलकोट श्री स्वामी समर्थांसाठी, अशा प्रकारे आपल्या जिल्ह्यातलं प्रत्येक गाव कशा ना कशासाठी तरी प्रसिद्ध असतच. कधी कधी ती प्रसिद्धी आपल्या गावापुरतीच रहाते. कारण आपल्या या गावाविषयी आपण बऱ्याचदा नकारात्मकच बोलतो. म्हणून मला वाटतं तुम्ही तुमच्या गावावर आधि प्रेम करा. कारण बघा, आपलं गाव, घर-दार सोडून शहरात कुठतरी वळचणीला छोटंस घर घेऊन मोल मजुरी करत जगण्यापेक्षा ऐसपैस जागेत रहाणारे आपण गाववाले, गाव कसं समृद्ध होईल, गावात असलेल्या गोष्टींचा वापर करून गावातला तरूण गावात कसा राहील हे पाहायलं पाहिजे. बघाना पोपटराव पवार यांनी हिवरे बाजार या आपल्या गावाचा कसा कायापालट केला हे जगप्रसिद्ध आहेच ना !’

      बरं आपल्या गावात बऱ्याच अडचणी असतील. त्या दूर व्हाव्यात यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे. मला माहित आहेत गावात समस्या असतातच. कारण मी ग्रामीण भागातलाच आहे. शेतकरी कुटुंबातला आहे मी. गावात रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य या अगदी प्राथमिक गरजा तर असतातच पण शेतकऱ्यांचा विचार केला तर न पिकणारी शेती, पडलेला दुष्काळ, घरातले सणवार, लग्नादि समारंभ, धार्मिक कार्यक्रम, पै-पाहुणे, जनावरांचा सांभाळ एक ना दोन कितीतरी दैनंदिन गोष्टी असतात, या सगळ्यांसाठी पैसाही लागतोच की मग त्यासाठी आपल्या उत्पन्नाचा स्त्रोत कसा वाढवायचा ? गावच्या गरजा काय आहेत ? काय उत्पन्न घेतलं तर चार पैसे मिळतील ? यासाठी कोणाचं सहकार्य घ्यायचं, कोणी कोणी स्वत:चा उत्कर्ष करून घेतलाय त्यांची माहिती, त्यांचा अनुभव जाणून घेणं या गोष्टींसाठी वेळ दिला गेला पाहिजे.

      मी पुढं मुलांना म्हंटलं की, ‘बघा चर्चा केल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत, सगळ्यांनी मनावर घेतलं तर गांव निश्चित सुधारेल. दिवसभरातील फक्त अर्धातास गावासाठी द्या. गावच्या अडचणी समजून घ्या, मला सांगा. आपल्याला तुमच्या गांवाविषयी काय करता येईल ते आपण करू, निधी कसा आणायचा त्यासाठी प्रयत्न करू. अजुन एक सांगायचं तर, सगळ्यागोष्टी शासनावर सोडून आपण गप्प राहतो. खरं तर शासनाव्यतिरिक्तही समाजाला सोबत घेऊनही आपण खूप काही करू शकतो. पाणी फाउंडेशन त्याचं खूप मोठं उदाहरण आहे. तुम्ही जर काही चांगलं करत असाल तर लोक तुमच्या बरोबर येतात. हा माझा अनुभव आहे. बघा ना ! २० वर्षापूर्वी जेव्हा मी लोकमंगलची स्थापना केली तेव्हा फक्त ७ लोक माझ्याबरोबर होते. मी काही चांगलं काम करतोय हे जाणवल्याने ७ ते १५ लोक झाले. त्यानंतर १५०० लोक सोबत आले आणि आज विस्तारलेला लोकमंगल समूह तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे.

       पुढच्या ४ वर्षात जवळपास पन्नास एक गाव आपल्याला सुधारायची आहेत. महात्मा गांधींनी ‘खेड्याकडे चला’ म्हंटलं होतं. कारण गाव समृद्ध झाला तर देश समृद्ध होणार आहे. आणि आपल्या सगळ्यांना आपला देश समृद्ध करायचा आहे. ही एक प्रकारची क्रांती असणार आहे आणि माझी पूर्ण खात्री आहे आणि अपार विश्वासही आहे की, ही, क्रांती करतील ते तरुणच. म्हणूनच मी तरुणांना साद घालतोय / मित्रांनो यू.पी.एस., एम.पी. एस. स्पर्धा परीक्षांना बसायचं आणि यशस्वी व्हायचं असेल तर प्रशासकीय अधिकाऱ्यांची कामं काय आहेत ? ती कशी केली जातात याचं ज्ञान तुम्ही गांवासाठी जे प्रॅक्टीकली कार्य कराल त्यातून गवसेल. आणि मग प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील असं मला वाटतं. पुस्तकी आणि प्रॅक्टीकली ज्ञान याचा समन्वय साधा आणि आपलं ज्ञान वाढवा.

      विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकाला चांगल्या जगण्यासाठी २५ ते ५० हजार रुपये महिन्याला मिळावेत ही अपेक्षा असते. तर तेवढं उत्पन्न कसं मिळेल याचाही आपण विचार करू. केवळ विचार नाही तर तो विचार प्रत्यक्षात कसा उतरावयाचा याचं ज्ञान मिळवू. आणि गाव समृद्ध करू. तुमच्याकडे काही कल्पना असतील, योजना असतील, संशोधन असेल, अडचणीवर, समस्यांवर उपाय असतील तर मला आवर्जून कळवा. मी निश्चित त्याची दखल घेईन.
   
        महाविद्यालयीन तरुणांशी साधलेला संवाद, माझ्या मनातील या भावना, हे विचार मी तुमच्याशीही शेअर केले. तुम्हाला हे विचार कसे वाटले हे तुम्ही नक्की माझ्याशी शेअर करा.

                                                                                                                                       - सुभाष देशमुख