नमस्कार,
ठाणे येथे १७ ते १९ मे २०१९ रोजी सोलापूर फेस्टचे आयोजन करण्यात येणार आहे, त्यानिमित्ताने...
आपण सगळे सुट्यांमध्ये किंवा दोन-चार दिवसाची सवड मिळाली की, कुठल्या ना कुठल्या गावाला जात असतो. कधी एखाद्या नातेवाईकाकडे, मित्रांकडे किंवा मग एखाद्या पर्यटनक्षेत्री. पण हे दोन-चार दिवस संपले की कधी एकदा आपलं गावंगाठू असं होऊन जातं. काही म्हणा पण आपलं गाव ते आपलं गाव. आपल्या गावातली हवा, पाणी, जेवण, आपली माणसं ते सगळं, आपलं जगणं आनंददायी करणारं असतं नाही का ! बाहेर कितीही चांगलं, सुंदर असलं तरी आपल्याला आपलं गावच छान वाटतं, आपल्याला सुरक्षित वाटतं.
आता माझं गाव तसं उस्मानाबाद जिल्ह्यातलं. पण मी धडपडलो, हरलो, जिंकलो, घडलो ते सोलापुरात. सोलापूरच्या मातीनं मला ओटित घेतलं. मला जगायला, लढायला शिकवलं. या जगण्याच्या, उभं रहाण्याच्या लढाईत कधी हरलो तर माझ्या अंगावरून मायेचा हात फिरवला, मला धीर दिला आणि पुन्हा उभं राहाण्यासाठी लढण्याची ताकत दिली. असं माझं हे सोलापूर. अशा माझ्या या सोलापूरातली माझी माणसं नेहमी माझ्या पाठीशी असतात, माझ्या कार्यात मला सदैव मदत करतात. त्यांची आत्मियता, त्यांचा आशीर्वाद मला सदैव मिळतो. म्हणून मला वाटतं मी खरच खूप भाग्यवान आहे. या सोलापूरकरांच्या ऋणातून मी कधीच मुक्त होऊ शकत नाही. आणि मग मी माझ्या या गावासाठी, गावच्या समृद्धीसाठी काही चांगलं करण्याचा सतत प्रयत्न करीत असतो.
या प्रयत्नात असताना मला एक जाणवलं की, गाव समृद्ध व्हायचा असेल तर आधी गावातली माणसं आर्थिक बाजूनं सक्षम व्हायला हवीत. कारण पोट रिकामं असेल तर तत्त्वज्ञानाला काही अर्थ उरत नाही. भरल्यापोटी मग आपल्या इतर बाबींचा म्हणजे सांस्कृतिक, साहित्यिक, आदिंच्या समृद्धीसाठी आपोआपच आपण विचार करायला लागतो. आपण जगभराचा इतिहास पाहिला तर एक लक्षात येतं की, जिथं औद्योगिक क्षेत्र संपन्न आहे, दैनंदिन गरजा भागून चार पैसे खिशात खुळखुळतात तिथली संस्कृती बहरलेली असते, सांस्कृतिक वैभव डोळ्यात भरणारं असतं बघा ना म्हणजे साधा एखादा सिनेमा किंवा नाटक पहायचं असेल तरीही आपण आपली दैनंदिन गरज भागली तरच या करमणुकीचा विचार करतो नाही का ? एखादं पुस्तक घ्यायचं झालं तर पोटाला चिमटा काढून सर्वसामान्य माणूस ही खरेदी करणार नाही. आणि म्हणूनच मला अगदी वाटतं की आधी चांगले पैसे कमवायला पाहिजे. हे पैसे कमवायचे असतील तर शेती किंवा उद्योग-व्यवसायाकडे लोकांनी वळलं पाहिजे. झालय काय नौकरी म्हणजे शाश्वती असं जुन्या लोकांना वाटतं पण मला नेहमीच वाटत आलय की तुम्ही दुसऱ्यांकडे नौकरी करण्यापेक्षा चार-चौघांच्या हाताला तुम्ही काम द्या आणि त्यासाठी उत्पादनाच्या क्षेत्रात माहिती घेऊन सक्षम होऊन उतरा.
आता तुम्ही म्हणाल, ‘या सुभाष देशमुखाचं काय जातय असं उद्योग-व्यापार करा म्हणायला ? काही उत्पादन केलं तर त्याला मार्केट कुठून आणणार? मोप आमचा माल क्वालिटीचा आहे पण त्याला बाजारपेठ नको का ?’ बरोबर बोललो ना मी ? तुमच्या मनात असा विचार आला असणार ना? हं... आता तुमचं हे बरोबरच आहे म्हणा, कारण तुमच्याजागी मी असतो तरी असाच विचार केला असता. म्हणून मग माझ्याबरोबर असणारे काही समविचारी, यांच्या सहकार्याने ‘सोलापूर फेस्ट’ अर्थात सोलापूर महोत्सवाची कल्पना सुचली आणि सगळ्यांच्या मदतीने नुकतेच एकापाठोपाठ एक पुणे आणि नवी मुंबईतल्या खारघर येथे ‘सोलापूर फेस्ट’ भरवला.
तुम्हाला सांगतो सोलापूर जिल्ह्यातल्या जवळपास १०० एक लोकांनी त्यांच्या उत्पादनाचे स्टॉल या महोत्सवात लावले. पुण्यात जवळपास दोन लाखाच्या आसपास तर खारघर येथे दिड एक लाख लोकांनी तीन दिवस या महोत्सवाला हजेरी लावली. नुसती हजेरीच लावली नाही तर प्रचंड प्रमाणात खरेदी केली. पुण्यात जवळपास तीन-चार करोडची उलाढाल झाली, तर खारघरमध्ये जवळपास २ कोटीची उलाढाल झाली. बाप्पा, काय सांगू तुम्हाला, माझा आनंद तर गगनात मावेनासा झालय.
आपल्या बचत गटाच्या आया-बहिणींनी उत्साहानं, या भावाच्या शब्दावर विश्वास टाकून आपला आपला स्टॉल उभा केला. शेंगाची चटणी, बासुंदी, शेवया- कुरड्या, पापड, लोणचं, ज्वारीची भाकरी, खास सोलापुरी स्पेशल मटन, चिकन, खिमा, शिख, सेंद्रिय ऊस, गुळ, पेरू, सीताफळ, कापडी पिशव्या, सोलापुरी हातमाग साड्या, चादरी, डाळिंब ज्यूस, हुरडा, ढाळा, कणसं, युनिफॉर्म, घोंगडी, सिल्क साड्या अशा शेकडो पदार्थाच्या, वस्तूंच्या स्टॉलमधून तोबा गर्दी झाली होती. यातली एक-दोन उदाहरणं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तिथं सोलापूरकरांना किती मोठा प्रतिसाद मिळाला ते.
लक्ष्मी बिराजदार नावाच्या एका भगिनीचा ज्वारीच्या कडक भाकरी-शेंगाच्या चटणीचा स्टॉल होता. तुफान चालला. त्याची दखल आय.बी.एन. लोकमत या नॅशनल चॅनलनं घेतली. तिची मोठी बातमी केली. या बातमीला दीड लाख लोकांनी फेसबुकवर लाईक केलय. या भगिनीला या २७ फेब्रुवारी पर्यंत १० हजार भाकरीची ऑर्डर मिळाली आहे. शिवाय राजस्थान, पुणे, मुंबई येथूनही भाकरीच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. हातमाग साड्याच्या स्टॉलमध्ये तर हातमागच्या साड्या शिल्लकच राहिल्या नाहीत. तांदूळवाडीच्या बासुंदी विक्रेत्यांन बासुंदीची वाढणारी विक्री पाहून दर चढते ठेवले तरीही लोकांनी बासुंदीची भरपूर खरेदी केली. त्यानं आणलेली बासुंदी संपली, चादरीचा तर १२ लाखांचा व्यवसाय झाला. घोंगडी विक्रेत्याच्याही शेकडोंनी घोंगड्या विकल्या गेल्या.
हे सगळं पाहून मला खूप समाधान लाभलं आर्थिक मदतीपेक्षा किंवा अनुदानापेक्षा खुल्या बाजारातून मिळणारा प्रतिसाद, झालेला नफा या उत्पादकांना, या शेतकऱ्यांना आत्मविश्वास देतो. अनुदानाच्या कुबड्या केवळ तात्पुरता टेकू देतात. आणी टेकू कधीच असू नये नाही का ? कारण कधी तो निसटेल हे सांगता येत नाही...
मुंबईच्या या सोलापूर फेस्ट अर्थात महोत्सवात सोलापूर जिल्ह्याच्या अध्यात्मिक क्षेत्राची माहिती व्हावी म्हणून श्री पांडुरंग, श्री सिद्धरामेश्वर, श्री तुळजाभवानी, श्री स्वामी समर्थ यांची छोटी पण सुबक मंदिराची उभारणी केली होती. तिथं ठेवलेल्या दानपेटीत अनेक भक्तांनी सढळ हाताने दान दिलं याच महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमपण खूप चांगले झाले. एका १६-१७ वर्षाच्या कृष्णा नावाच्या मुलीने अप्रतिम भारुड सादर केलं. सोलापूरच्या शिवरंजनी ग्रुपने गाण्याचा बहारदार कार्यक्रम सादर केला. लावणीचाही एक कार्यक्रम लोकांना खूप आवडला. अशा चांगल्या कलावंतांना त्यांची कला सादर करण्यासाठी एक चांगला मंच उपलब्ध करून देता आला, त्या कलावंताना एक संधी देता आली याचं समाधान खूप मोठं आहे.
मध्यंतरी सोलापूरच्या कापड उत्पादकांचं एक प्रदर्शन बेंगलोरला भरवलं होतं. खूपच चांगला प्रतिसाद तिथं मिळाला. या ठिकाणी सोलापूरच्या कापड उत्पादकांनी तयार केलेल्या युनिफॉर्मसना चांगली मागणी आली. या प्रदर्शनाला २० राज्यातून एक हजार ९६७ तर कतार, दुबई, ओमान, यु.एस.ए., माली, फ्रांस, मार्टिन या सात परदेशातील प्रतिनिधींनीही भेट दिली. या प्रदर्शनामुळे महाराष्ट्रा बाहेरच्या राज्यांनी गणवेश खरेदीसाठी ऑर्डर दिल्या. सोलापुरातील एका व्यापाऱ्याबरोबर दर महिना १५ हजार प्रमाणे पुढील ५ वर्षासाठी ९ लाख शर्टस् देण्याचा करार केलाय. यापुढे जवळपास ३००० जणांना यातून रोजगार उपलब्ध होईल. असंहे प्रदर्शन भारतात पहिल्यांदाच झालं.
आधी घर, मग गाव आणि मग जिल्हा, राज्य आणी राष्ट्र या सगळ्यांची प्रगती एकमेकावर अवलंबून आहे. म्हणजे बघा ना ! घर समृद्ध तर गाव आणि अर्थातच गाव समृद्ध झालं तरच देश समृद्ध होणार ना ! आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की घरबरोबरच देशाचाही विचार केला गेला पाहिजे. यासाठीच गावाविषयी कृतज्ञ रहा, गावाच्या उत्कर्षासाठी झटून काम करा. संकट येणार पण त्याला घाबरू नका. उलट संकटाला संधी बनवा आणी पुढे चला. तुम्ही आत्मविश्वासाने एक जरी पाऊल पुढं टाकलं तर अनेकांचे हात तुम्हाला मदत करतील. सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत.
नवी मुंबईकरांनी सोलापूरची श्रीमंती पाहून अवाक् झाले. म्हणून यानंतर ‘सोलापूर फेस्ट’ आता अनेक शहरांमध्ये घ्यायचा विचार आहे. यासाठी तुम्ही सज्ज आहात ना ! मग कोणता माल विकणार या महोत्सवात ? कोणते उत्पादन विकणार हे लगेच ठरवा आणि तसं नियोजन करा. आणि तारीख कळल्या-कळल्या स्टॉल बुक करा. कारण आता गर्दी होणार बरं का स्टॉल बुकिंगसाठी ! मी विशेषतः आवाहन करतो महिला बचतगटाच्या माय-बहिणींना. आपण ‘सोलापुरी वेगळेपण’ सिद्ध करा. तुम्ही समृद्ध व्हा आणि देश बळकट करण्यासाठी देशालाही समृद्ध करा.
खरं तर या पुणे, मुंबई येथे झालेल्या सोलापूर महोत्सवाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे मी खूप आनंदीत झालोय. मला खूप समाधान वाटतय. हे समाधान असच टिकून राहू दे असा आशीर्वाद मागतो, ठाणे येथे १७ ते १९ मे २०१९ रोजी सोलापूर फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये आपला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा अशी आशा करतो आणि थांबतो.
- सुभाष देशमुख
1 Comments
Best wishes...
ReplyDeletePost a Comment