नमस्कार

      ७ जून मृगनक्षत्राची सुरुवात म्हणजेच पावसाची सुरुवात असते. उन्हाच्या तीव्र झळांनी त्रस्त असलेले आपण सगळेच वरुणराजाची प्रतिक्षा करत असतो. आपण तर करतोच पण जीवसृष्टीतील प्रत्येक घटक पावसाच्या प्रतिक्षेत असतो. झाडं-झुडपं, वेली, पशु,-पक्षी, प्राणी असा प्रत्येक जीव त्या वरुणराजाची प्रार्थना करत असतो. शेतकरी तर डोळ्यात प्राण आणून ढगांच्या बरसण्याची वाट पहात असतो. ‘गेल्या वर्षी दुष्काळ होता पण यंदा पाऊसपाणी चांगलं होईल, चार पैसे हाती येतील, सण वार चांगले साजरे करता येतील, पडलेल्या घराची डागडुजी करून घेता येईल, पोराला शिक्षणासाठी शहराला पाठवता येईल, पोरीला तिच्या आवडीचं शिक्षण देता येईल, वयात आलेल्या पोरिचं यंदा लगीन ठरलेले आहे ते चार पाहुण्या – रावळ्यांना बोलावून वाजंत्री वाजवून बऱ्यापैकी करता येईल, खूप दिवस बायको अंगावर दुखणं काढतीया तिला शहरातल्या चांगल्या डॉक्टरला दाखवता येईल. मागल्या वर्षी शेतीसाठी काढलेलं कर्ज यंदा थोडं तरी फेडता येईल. अशी एक ना अनेक स्वप्नं त्यानं उराशी बाळगलेली असतात. रात्री तो झोपतो तो ही स्वप्नं डोळ्यात घेऊन आणि सकाळी उठतो तो ही स्वप्नं कवटाळूनच.

      आणि मग एक दिवस त्याच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी वरुणराजा प्रसन्न होतो. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा चमचमाट, ढगांचा गडगडाट घेऊन पाऊस जमिनीकडे झेपावतो. शेतकऱ्याचे डोळे आनंदानं भरून येतात. तर बऱ्याच दिवसापासून पिण्याच्या पाण्याचे हाल सोसणाऱ्या लोकांना या पावसामुळे दिलासा मिळतो. चला आता प्यायला पाणी मिळेल, पालिका-महापालिका आता रोज नाही तर दोन दिवसाआड तीर पाणीपुरवठा करेल. पत्र्याच्या घरात राहणाऱ्यांना उन्हाच्या काहीलिंनी जीव नकोसा झालेला असतो त्यांना पावसाच्या सरी कोसळल्याने पत्र्यावर होणारा मोठा आवाज मधूर वाटतो आणि आता पत्र्याच्या या घरात थंडावा मिळणार म्हणून आनंद झालेला असतो. जमिनीत पाणी येऊन जमिनीची धग शांत होणार म्हणून ही धरणीमाताही सुखावली जाते.

      पावसाला सुरुवात होते. पाऊस पडायला लागतो. एक-दिवस, दोन-दिवस. रिमझिम पडणारा पाऊस आता धो-धो कोसळायला लागतो. परिसरातले ओढे, नाले भरून वहायला लागतात, पाहता पाहता नदी तुडूंब भरते, जवळपासची धरणे गच्च भरतात, धरणांचे दरवाजे उघडले जातात, नदी धोक्याची पातळी ओलांडते आणि पाणी गावात शिरायला लागते. गावकरी फार धास्तावलेले नसतात कारण पाऊस थांबले, एक-दोन दिवसात पाणी ओसरेल या अपेक्षेने घरातच थांबून राहतात.

      आयुष्यवेचून बांधलेलं घर, झोपडी, पत्र्याचे शेड, किडूक-मिडूक करत जमवलेल्या घरातल्या वस्तु, भांडी-कुंडी, धन-धान्य, जनावरं, सोनं-नाणं, काय काय म्हणून नसतं घरात; आणि आणि महत्वाची म्हणजे माणसं काळजाजवळची, घरातली माणसं. आई-वडील, भाऊ-बहिणी, नातवंडं या सगळ्यांमुळे घर गोकुळ झालेलं असतं. दिवसभर काम करून जेव्हा संध्याकाळी घरातला कर्ता, स्त्री-पुरुष घरी येतात तेव्हा  या लहानग्या हातांच्या विळख्याने सगळे श्रम, दु;खं विसरून कुटुंब आनंदात रंगून जात असतं. म्हणून मग सगळे या पावसात एकमेकांना धरून घरातच थांबतात. बघता बघता घर पाण्यात बुडायला लागतं. घरच नव्हे तर गांवच्या गांव, शहर पाण्यानं वेढलं जातं, पूराचं थैमान सुरु होतं. आता मात्र जीव घाबराघुबरा होतो. आपल्या एकट्याचा नव्हे तर सगळ्यांचा जीव वाचवायचा असतो. आणि मग बाहेरून कोणी कोणी वाचवायला येतं त्या जीवघेण्या पुरातून बाहेर नेण्यासाठी अनेक हात मदतीला येतात.

      सहकार, मदत-पुनर्वसन मंत्री म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून हे सगळं पाहताना मन भरून आलं माझं बालपण खूप हलाखीत गेलं म्हणून घर, कुटुंब, घर उभं करण्यासाठी केलेले अतोनात कष्ट, ते जेव्हा उध्वस्त व्हायची वेळ येते तेव्हा झालेल्या वेदना या सगळ्याचा अनुभव मी जवळून घेतलाय. निसर्गाचा कोप हा साधा-सुधा नसतो तर सगळं खाक करणारा असतो याचा अनुभव नुकताच सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यानं घेतला.

      पूर आला, ओसरला पण त्यात भरडल्या गेलेल्या सांगली, कोल्हापूरच्या जनतेला सावरायला वेळ लागेल. पण जर तुम्ही आम्ही सहकार्य केलं, मदतीचा हात पुढे केला तर हे संकट सौम्य व्हायला मदत होईल. छोटी छोटी दुकानं, छोटे व्यापारी, शेती-भाती, जनावरं, घरगुती वस्तू, कपडालत्ता, भांडी-कुंडी असा सगळा संसारोपयोगी ऐवज सगळं सगळं कृष्णामाईनं पोटात घेतलं. तिने तिच्या लेकरांचे हात रिकामे करून टाकले पण जर तुम्ही आम्ही ठरवलं तर त्या रिक्त हातांची ओंजळ आपण भरून देऊ शकू. अर्थात महाराष्ट्रातून अनेकजण मदतीसाठी पुढे आले आहेत. धन-धान्य, कपडालत्ता, भांडी-कुंडी, अन्न अशा अनेक प्रकारची मदत, मदतीचा ओघ सांगली-कोल्हापूरकडे आहे. उध्वस्त झालेले संसार सावरण्यासाठी लाखो लोकांचे हात सरसावले आहेत. सरकारचे तर कर्तव्यच आहे म्हणून सरकारपण जी-जानसे या लोकांना मदत करत आहे. सांगलीकरांनी घाबरून जाऊ नये. सरकार त्यांच्या पाठीशी आहे. ज्यांची घरं पडलीत त्यांना घर बांधून देण्याचा संकल्प सरकारनं केला आहे. आर्थिक मदतही केली जाते आहेच. गेलेला माणूस परत आणता येणार नाही पण त्या कुटुंबाला आधार देण्याचं काम तरी आपण करू शकतोच ना !

      पूर ओसरल्यानंतर आव्हान आहे ते स्वच्छतेचं आणि रोगराई पसरू नये याचं. त्यासाठी खूप काळजी घेणं गरजेचं आहे. सांगलीतील नगर वाचनालयातील जवळपास ९० हजार पुस्तकांचा लगदा झालाय. हे पाहून तर माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. पुस्तक माणसाला घडवतात पुस्तक गुरु असतात पण हे ज्ञानमंदिरच उध्वस्त झालय. यासाठीपण आपल्याला काम करायचं आहे.

      सगळ्यात श्रेष्ठ धर्म माणुसकीचा आणि ती माणुसकी आज ठायी ठायी दिसते आहे. मिरजमधील एक साडेचार वर्षाची मुलगी सारादोरकर हीने आपल्या खाऊचे म्हणून साठवलेले पैसे पूरबाधितांसाठी म्हणून माझ्याकडे सुपूर्त केले, तेव्हा माझे डोळे पाणावले आणि त्या मुलीवर तिच्या घरच्यांनी जे संस्कार केले ते पाहून तिच्या घरच्यांविषयी आदर वाटला. अशा संकटाच्या काळातच कळतं एक माणूस म्हणून कसा वागतो ते.

      तर आता अनेकांना नव्यानं संसार उभा करावा लागतोय. घर म्हंटले तर काय लागत नाही. चहाची पावडर, दुध, साखर, गॅस, भांडी, चहागाळणी अशा एक ना अनेक वस्तु घरगृहस्थी चालवण्यासाठी हव्या आहेत. दुदैव म्हणजे सगळं गावच पाण्याखाली गेल्यानं, आता पाणी उतरलं गेलं असलं तरी रोजगारच मिळत नाहीए. त्यामुळं ज्यांचं पोट रोजंदारीवर आहे त्यानं काय खायचं ? छोटे छोटे व्यापारी तर पार कोलमडलेत. एका हॉटेलचालकाला पाण्यात उध्वस्त झालेलं हॉटेल पाहून हार्टअॅटेक आला. मी खूप अस्वस्थ झालो. अशाप्रकारे लाखो लोक या परिस्थितीनं बाधित झाले आहेत. संकट अस्मानी आहे.

      पण... पण तरीही हिमंत हारून चालणार नाही, हताश होऊन चालणार नाही तर आता या परिस्थितीला तोंड देऊन  या पूरग्रस्तांना पुन्हा उभं करावं लागणार आहे. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की, जमेल ती, तेवढी मदत प्रत्येकांन करा. ईश्वरानं तुम्हाला जे आयुष्य दिलय, त्यानं ज्या काही चांगल्या गोष्टीक तुम्हाला दिल्यात त्याबदल्यात ऋण फेडण्याची संधी आहे ही. तेव्हा तुमच्या घासातला घास, तुमच्या कमाईतला रूपाया का असेना पण या संकटग्रस्तांना द्या. सरकार त्यांच्या पाठीशी आहेच. त्यांना हे सरकार नक्की सावरायला मदत करेल, उभं रहाण्यासाठी आधार देईलच. पण तुम्ही त्या पायांना बळ द्या, त्या हातांना हातात घ्या, त्या डोळ्यातल्या स्वप्नांना आकाश द्या. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा अडचणींचा पर्वत आपण सगळे मिळून उचलूया आणि माणुसकीचं दर्शन घडवू या. या जगातून अजून माणुसकी संपलेली नाही यावर माझा विश्वास आहे.

      एक सांगावसं वाटतं, भौगोलिक परिस्थिती पाहता कृष्णा-वारणा नद्यांचा संगम, धरणातून होणारा विसर्ग, पर्जन्यमान लक्षात घेता पाण्याचं सुयोग्य नियोजन करणं गरजेचं आहे. पूररेषेतील अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम या पार्श्वभूमीवर भविष्यात पूररेषेचं उल्लंघन होणार नाही, अनधिकृत बांधकाम फोफावणार नाही, या दृष्टीकोनातून प्रशासनानं अधिक कडक भूमिका घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम न करणं हे कर्तव्य जनतेनंही पार पाडावं. पर्यावरणाला धक्का लागेल असं कृत्य केलं नाही तरच भविष्यातील नैसर्गिक आपत्तींची आव्हानं कमी होऊन पुढच्या पिढ्यांना एक चांगला वारसा मिळेल, असं मला वाटतं. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याच्या प्रतीक्षेत मी आहे.