नमस्कार
     आज आषाढी एकादशी. सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरला विठोबारायाच्या भेटीच्या ओढीने मार्गस्थ झाल्या, वारकरी देहभान हरपून विठुरायाच्या नामस्मरणात दंग होते. पाऊस-पाणी, ऊन-वारा कशाचीही तमा न बाळगता हा वारकऱ्यांचा महासागर चंद्रभागेला जाऊन मिळण्यासाठी आतुर होता. सगळं पाहात असताना, वाचत असताना मला माझ्या लहानपणी आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी माझी आई आणि पिताजी स्वयंपाक करून जेऊ घालत तो सगळा माहोल आठवला. कितीही वर्तमानात जगायचं ठरवलं तरी भूतकाळ नजरेसमोर येतोच. खरं तर काही विद्वान म्हणतात की भविष्यकाळ आणि भूतकाळाचा विचार करण्यापेक्षा वर्तमानकाळाचा विचार करा. वर्तमानकाळ जगा. एकापरीनं खरं आहे त्यांचं पण मला असं वाटतं की, भूतकाळाकडे आपण जाणीवपूर्वक विचार करण्यापेक्षा वर्तमानकाळाचा विचार आपला वर्तमान आणि भविष्यकाळ चांगला होण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
      भूतकाळातल्या आठवणी आपण जागवल्या तर लक्षात येतं की किती संकट आपल्यावर आली होती, किती अडचणींना आपण तोंड दिलं होतं, किती समस्या आपल्यावर कोसळल्या होत्या, किती अपयश पदरात पडलं होतं आणि या सगळ्यांशी आपण कसा कसा मुकाबला केला होता, या सगळ्यातून आपण बाहेर कसे पडलो, कसे आणि काय काय शिकलो, काय धडा मिळाला ?, हे सगळं लक्षात येतं.
      मी लहानपणी अभ्यासात हुशार होतो. सातवीला बोर्डाच्या परीक्षेत पहिला आलो होतो पण पुढे क्रिकेट खेळताना डोळ्यावर चेंडू आदळला आणि माझ्या दृष्टीवर परिणाम होऊन माझी शाळा मॅट्रीकनंतर थांबली. आई-वडील शिक्षक पण त्यांच्या जीवावर बसून खाणं मनाला रुचेना. आपण तरूण आहोत, आपण काम केलं पाहिजे ही जाणीव मन पोखरायला लागली आणि मग मुंबईत पोल्ट्रीफार्मवर कोंबड्यांची घाण काढण्यापासून पोल्ट्री फार्म सांभाळण्यापर्यंत सगळी कामं केली, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यावर मजूर म्हणून मुकादम म्हणून काम केलं, गायी सांभाळल्या, किराणा दुकान चालवलं. एक ना दोन; पण जगण्याची धडपड सुरु ठेवली. त्यानंतर छोटसं कॉन्ट्रॅक्ट मिळालं, एका मित्रानं ५०० रु. ची मदत केली. आणि माझ्या कामकाजाला सुरुवात झाली. हा सगळा भूतकाळ मी विसरू शकत नाही म्हणून मग शिकण्याची धडपड करणाऱ्या पण आर्थिक बळ नसल्याने शिक्षणात अडचण आलेल्या विद्यार्थांच्या शिक्षणासाठी आपण सहाय्य केलं पाहिजे ही प्रबळ जाणिव निर्माण झाली. त्यातून विद्यार्थांना अर्थसहाय्य करता यायला लागलं. यातून शिकलेल्या व आर्थिक स्थैर्य मिळवलेल्या मुलांना सांगितलं की तुम्हीही अशीच शिक्षण घेताना आर्थिक अडचण येणाऱ्या मुलांना सहाय्य करा. ती मुलं आता हे काम करताहेत. हा आनंद मला खूप मोठं समाधान देऊन जातो.
        भूतकाळातला दुसरा प्रसंग आठवतो. मला कामासाठी पैशांची गरज होती. बँकामध्ये कर्जासाठी हेलपाटे घातले पण पत आणि ओळख नसल्याने माझं काम पाहूनही मला बँकांनी कर्ज नाकारलं. पण मी हताश झालो नाही. तुम्ही जर सच्च्या दिलानं, प्रामाणिकपणे काम करत असाल तर मार्ग सापडतो. तसं माझंही झालं. आणि पुढे या कामात मी गती घेतली. आणि ठरवलं की प्रामाणिकपणे कष्ट प्रगतीचं स्वप्न पहाणाऱ्या तरुणांना, उद्योजकांना आर्थिक सहाय्य केलं पाहिजे आणि यातून लोकमंगल बँकेची स्थापना केली.
      सांगायचा मुद्दा हा की भूतकाळ तुम्हाला खूप काही शिकवतो, समृद्ध करतो, कडू-गोड आठवणी संयमानं स्विकारायलाही हा भूतकाळ तुम्हाला सहाय्य करतो. भूतकाळातला अनुभव घेऊन वर्तमानात कृती केली तर भविष्यकाळ उज्वल ठरतो असं मला वाटतं.
      आपण अनेक थोरा-मोठ्यांची चरित्रं वाचतो. ही चरित्रं म्हणजे एक भूतकाळच असतो ना ! त्यांचं जीवन, त्यांचं जगणं, त्यांचे प्रयत्न, त्यांनी केलेली समाजसेवा, देशसेवा या सगळ्यांच आकलन या चरित्रांमुळे होतं. आणि यातूनच आपल्याला प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचल्यावर लक्षात येतं की शासक कसा असावा ? शासन कस करावं ? त्यांच्या काळातही दुष्काळ पडलेला असताना त्यांनी केलेल्या उपाय योजना, पाण्याचं नियोजन, किल्ल्यांचं सरंक्षण, शत्रूपक्षावर केलेली मात, त्यांचं युध्द कौशल्य, रयतेप्रती असलेलं प्रेम, कर्तव्य या सगळ्या बाबी आपल्यावर संस्कार करतात ना ! महात्मा फुलेंविषयी वाचतो तेव्हा समाज उद्धारसाठी, समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांनी खाल्लेल्या खस्ता, घेतलेले कष्ट, प्रबोधन या सगळ्याची जान येते आणि आपणही असं कार्य केलं पाहिजे हा विचार बळावतो.
      व्यक्ति असो, समाज, राज्य, देश असो यांच्या उत्कर्षात त्यांचा भूतकाळ खूप मोठं कार्य करतो. म्हणून मला असं वाटतं की भूतकाळ विसरू नये आणि त्या भूतकाळाकडे डोळसपणे, विचारपूर्वक पहायला शिकलं पाहिजे. अर्थात भूतकाळाकडे पहाताना त्यातून बाहेरपण येता आलं पाहिजे नाहितर भूतकाळच कवटाळून बसलो, तर प्रगती खुंटण्याचा संभव अधिक असतो, भूतकाळात रमलेले निष्क्रिय होतात अशीही उदाहरणं खूप पहायला मिळतात. भूतकाळाचा उपयोग झालेल्या चुका पुढे न करण्यात व्हायला हवा, भूतकाळातील जाज्वल्य घटना आठवून वर्तमान व भविष्य घडवायला सिद्ध व्हायला हवं, तरच भूतकाळ केवळ भूतकाळ न राहता तुमच्या उत्कर्षात गुरु म्हणून, सन्मीत्र म्हणून तुम्हाला मार्गदर्शक ठरेल यात संशय नाही.
      माझ्या मनात काही विचार आले की तुमच्याशी शेअर करायला. हवं असं वाटते म्हणून हा संवाद. माझे विचार तुम्हाला कसे वाटले हे आवर्जून कळवा.
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

आपला,
सुभाष देशमुख