नमस्कार
आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलोय, म्हणजे जवळपास सगळ्यांनीच लहानपणी ही गोष्ट ऐकली असेल असं मला वाटतं. ती गोष्ट म्हणजे ससा आणि कासवाची, अर्थात या दोघांच्या शर्यतीची. मी जेव्हा लहान असताना ही गोष्ट ऐकली तेव्हा मला नवलच वाटलं होतं. म्हणजे गोष्ट सांगणाऱ्या शिक्षकानं, आजीनं ‘आज मी तुम्हाला ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्ट सांगणार आहे’ असं म्हंटलं आणि माझ्या मनात चट्कन येऊन गेलं, की असे ससा आणि कासव यांच्यात शर्यत असते का ? पण जेव्हा गोष्ट सुरु झाली आणि मला उमगायला लागलं की, अरेच्या पळणाऱ्याशी पळूनच शर्यत जिंकायची असते असं नाही तर सतत आणि सातत्याने चालत आणि स्वत:विषयी आत्मविश्वास बाळगून आणि केवळ शर्यत जिंकण ही इर्षा न ठेवता आपण आपल्यातल्या सर्वशक्तीनिशी प्रामाणिक प्रयत्नाची कास धरत इच्छीत स्थळी पोहचण्यासाठी शर्यतीत उतरलो तर विजय नक्की मिळतो. पण त्यासाठी लागते अपार सहनशीलता. म्हणजे पहा हं ! कासावानं त्यावेळी पाय दुखताहेत, चालून चालून कंटाळा आला, ऊन लागतय, दगड-धोंडे वाटेवर खूप आहेत किंवा कुश्चितपणे सगळे हसताहेत ‘हा बघा हळू हळू चालणारा कासव, हा शर्यत जिंकणार म्हणे’ असं त्याची टवाळी करणाऱ्या लोकांकडे लक्ष दिल असतं आणि हे काहीच सहन न होऊन सशाप्रमाणे कुठेतरी गर्द सावलीखाली विश्रांतीसाठी थांबला असता तर ... तर मंडळी, कासवपण शर्यत जिंकू शकतो, हा आत्मविश्वास निर्माण झालाच नसता नाही का !
जेव्हा मी लोकमंगल समुहासाठी बोधचिन्ह करायचं ठरवलं, तेव्हा सोलापुरातील कवी नारायणकाका कुलकर्णी यांनी कासवाच बोध चिन्ह आणि ‘अखंड गतितून सार्थकता’ हे बोधवाक्य सांगितलं तेव्हा मला खूप समाधान वाटलं. कारण कठीण प्रसंगी आपली सगळे पाय पोटात घेऊन कणखर पाठीची ढाल करून, पाण्यात आणि पाण्याबाहेरही राहण्याची तयारी करून जगणारं कासव मला सर्वार्थाने आवडलं आणि गेली जवळजवळ २० एक वर्ष या कासवाची ‘अखंड गतितून सार्थकता’ सार्थकी लागते आहे. पाठीवर होणारे आघात पचवण्याची, शांतपणे सहन करण्याची ताकत कासवात असते. दूर राहूनही केवळ नजरेनं आपल्या लेकरांचं पालनपोषण कासव करतं आणि प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर आपल्या निष्ठेने, शांतपणे ते आपलं अस्तित्व सिद्ध करत असतं.
सहनशीलता हा ईश्वराने दिलेला सर्वश्रेष्ठ गुण आहे. अगदी आपल्याला शरीर देतानाही ईश्वराने त्या शरीरात सहनशीलता पेरली आहे. पण आपण ती ओळखत नाही. थोडीशी सर्दी झाली, खोकला झाला, कुठं दुखलं-खुपलं की आपण लगेच औषधांचा मारा करतो. पण वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मंडळी सांगतात की, आपल्या शरीरात या छोट्या-मोठ्या आजारांविरुद्ध लढण्याची ताकत निसर्गानं दिलेली आहे. फक्त थोडं सहन करता आलं पाहिजे. थोड्या वेदना सहन केल्या तर विनाऔषध शरीर त्या रोगावर मात करण्याचा प्रयत्न करतं. पण आपल्याकडे शरीराचं हे बोलणं ऐकायला वेळच नसतो आणि औषधांचा मारा करून आपण ईश्वरानं दिलेल्या ताकतवर शरीराला-मनाला दुर्बल करतो.
मला नेहमी वाटतं की, सहनशीलता तुमचा आत्मविश्वास वाढवते, टिकवते. बघा ना ! एखादं कुटुंब असतं. त्या कुटुंबात दोन-चार भाऊ, त्यांचं कुटुंब एकत्र गुण्यागोविंदाने, आनंदाने चांगल्या-वाईट काळात एकमेकांना सांभाळून घेत नांदत असतं. पण त्या घरातली एकी, आनंद शेजारच्याला पहावतोच असं नसतं ना ! मग तो त्या घरात काड्या करायला लागतो, खरं-खोटं त्या घरातल्या व्यक्तींना सांगायला लागतो. एकमेकांची मनं कलुषीत व्हावीत, अविश्वास वाढावा आणि त्या घराच्या एकीची ताकद संपवून त्यांच्यात दुही माजावी. ते वेगळे व्हावेत, एकमेकांच्या विषयी संशय बळावत जावा, विश्वास कमी व्हावा, म्हणून सातत्याने प्रयत्न करत असतात. घरातली लहान-थोर माणसं या सततच्या कागाळीनं हैराण होतात. यात काही हलक्या कानाचे, प्रगल्भ नसलेल्या व्यक्तींना त्या बाहेरच्या व्यक्तिचं सांगणं खरं वाटायला लागतं, घरात अशांतता पसरायला सुरुवात होते. पण त्याच क्षणी घरातली विचारी, प्रगल्भ मोठं माणूस सगळ्यांना सबुरीचा सल्ला देतो, या सगळ्या बेबनावाला सहनशीलतेनं तोंड देण्याविषयी सांगतो, ‘ थोडं थांबा’ असं निक्षुन पण आत्मियतेनं सांगतो. हळूहळू दिवस पुढे जातात आणि मग घरच्यांच्या लक्षात येतं, ‘ अरे हा तर या शेजाऱ्याचा बनाव होता, आपलं घर फोडण्याचा अविश्वास पसरवण्याचा डाव होता.’ आणि मग घरचे त्या शेजाऱ्यांच्या या डावाला न फसता आपल्या माणसांवरचा, एकमेकांवरचा विश्वास धरून ठेवतात आणि मग त्या घरातली शांती, समाधान आबाधित रहाते. पण यासाठी सहनशीलतेनं खूप मोठं काम केलेलं असतं. घरच्यांच्या सहनशीलतेचा विषय झालेला असतो.
हे झालं कुटुंबाविषयी. पण असाच अनुभव समाज, गाव, जिल्हा, राज्य देश याबाबतही येत असतो ! प्रवाहाविरुद्ध जाऊन काही चांगलं करण्याच्या व्यक्तिविरुद्ध हे असे प्रसंग नेहमीच घडतात. पण समाजहित, देशहित, राष्ट्राच्या ऐक्यासाठी, राष्ट्राच्या उत्कर्षासाठी, राष्ट्राच्या वैभवसंपन्नतेसाठी अनेक समाजधुरिणांनी, नेत्यांनी खूप काही सहन केलेलं असतं म्हणून तो देश, तो समाज पुढं गेलेला असतो. भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्राजांनी केलेला अनन्वीत छळ आपल्या भारत मातेच्या शेकडो-हजारो सुपुत्रांनी किती धैर्यानं सहन केला आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. शारीरिक, मानसिक आणि वैचारिक छळ त्यांनी हे सगळं सहन केलं ते मायभूमीसाठी, भारत मातेसाठी. त्यांनी जर तो छळ सहन केला नसता तर... तर आज आपण स्वतंत्र भारताचे नागरिक नसतो, पारतंत्र्याच्या जोखडातून स्वतंत्र झालो नसतो आणि गुलाम म्हणूनच जगलो आणि मेलो असतो. भारताच्या स्वांतत्र्य लढ्यात प्राणार्पण करणाऱ्या, आयुष्याचं अघ्र्य देणाऱ्या या समस्त स्वातंत्र्यवीरांची सहनशीलता, प्रगल्भता आणि उत्कट देशप्रेम आपल्या सगळ्यांमध्ये येवो आणि भारताच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वस्वानिशी आपण सगळेच सतत आणि सातत्याने कार्यरत राहू, अशी प्रार्थना करतो.
- सुभाष देशमुख
0 Comments
Post a Comment