देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर ते प्रदेश अध्यक्ष असताना आणि मुख्यमंत्री असताना काम करण्याचा योग मला मिळाला. त्यांच्या सहवासात राहताना देवेंद्र फडणवीस या व्यक्तीची अनेक रुपे पाहावयास मिळाली. एक उत्तम कर्णधार, कणखर प्रशासक, भविष्याची जाण असणारा राज्यकर्ता, प्रतिस्पर्ध्यांना चितपट करण्यासाठी आवश्यक असलेली व्युरचना करणारा मुरब्बी राजकरणी अशा अनेक रुपांचे दर्शन मला घडले. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना मोठा आनंद मिळतो. फडणवीस प्रदेश अध्यक्ष झाल्यावर माझ त्यांच्याशी अधिक संपर्क आला. आम्ही सोलापूर जिल्ह्यात बंधारे बांधले होते. या बंधा-यांची पाहणी करण्यासाठी या, अशी विनंती मी त्यावेळी प्रदेश अध्यक्ष असलेल्या फडणवीस यांना केली होती. माझी विनंती त्यांनी तात्काळ मान्य केली.
 आम्ही बांधलेल्या बंधा-यात चांगलेच पाणी साठले होते. आमच्या विनंती मान देवून ते आले आणि त्यांनी मनापासून बंधा-यांची पाहणी केली. आमच्याकडून बंधा-यांबाबतची माहिती आत्मीयतेने जाणून घेतली. त्यांच्या हस्ते आम्ही बंधा-यांच्या पाणी पुजनाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. एखादी चांगली गोष्ट दिसली की त्यांची तात्काळ अंमलबजावणी करायची असा देवेंद्रजींचा स्वभाग आहे.  आमच्या बंधा-यात साठलेले पाणी पाहून ते खुश झाले होते. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी सर्वप्रथम जलयुक्त शिवार योजनेची घोषणा केली. आपल्या सहका-यांच्या विधायक कामाचे कौतुक करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण अशा महत्त्वाच्या विषयात त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. यावेळी त्यांची काम करण्याची शैली, निर्णय घेण्याची हातोटी, सर्वांशी विचारविनिमय करण्याची वृत्ती मला जाणवली. कर्जमाफीच्या विषयावरुन राज्यभरात चांगलेच वातावरण तापले होते. कर्जमाफीचा निर्णय घेताना त्याचे फायदे छोट्या, गोरगरीब शेतक-यांनाच मिळाले पाहिजेत असा देवेंद्रजींनी दृष्टीकोन होता. त्या दृष्टीने देवेंद्रजींनी कर्जमाफी योजनेची रुपरेखा निश्चित केली. बड्या शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळू नये या दृष्टीने त्यांनी कर्जमाफीसाठी विशिष्ट अटी घातल्या. आघाडी सरकारच्या काळात झलेल्या कर्जमाफी योजनेचे फायदे बड्या शेतक-यांनी लाटले होते. हा अनुभव देवेंद्रजींनी लक्षात घेतला होता.  कर्जमाफी योजनेची रुपरेखा तयार करताना देवेंद्रजींनी या विषयाशी संबंधीत अनेकांशी चर्चा केली. शरद पवार यांच्या सुचना जाणून घेण्यासाठी त्यांनी चंद्रकांतदादा पाटील यांना त्यांच्याकडे पाठवले. उध्दव ठाकरे यांच्याही सुचना त्यांनी जाणून घेतल्या. सर्वांना विश्वासात घेवून काम करण्याची त्यांची शैली मला भावली आहे. मराठा आरक्षणाचा विषय कमालीचा टोकदार झाला होता. राज्यभर निघालेल्या मुक मोर्चामुळे वातारण तापले होते. हा विषय देवेंद्रजींनी कमालीच्या शांततेने हाताळला. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण घ्यायचेच, असा निर्णय त्यांनी केव्हाच घेतला होता. मात्र हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकले पाहीजे यासाठी ते प्रचंड आग्रही होते. आरक्षण न्यायायलात टिकले पाहीजे यासाठी आवश्यक ती तयारी करण्याच्या कामात त्यांनी स्वतःला गाडून घेतले होते. या विषयासंदर्भात त्यांनी अनेक कायदेतज्ज्ञांशी प्रदीर्घ चर्चा केली. आरक्षणाला निर्णय लवकर होत नाही. असा आरोप करत आंदोलकांनी तसेच विरोधकांनी देवेंद्रजींवर जोरदार टीका सुरु केली होती. मात्र देवेंद्रजींनी टिकेची पर्वा न करता आरक्षणाचा मसुदा तयार करण्यासाठी संबंधितांना पुरेसा वेळ दिला. मागासवर्गीय आयोगाची नियुक्ती केली. तसेच या आयोगाकडून शासनाला लवकरात लवकर अहवाल मिळाला यासाठी त्यांनी मोठा पाठपुरावा केला. एखाद्या विषयात हा माणूस स्वतःला कसा झोकून देतो हे मी त्यावेळी पाहिले. 
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरजू व गोरगरिब रुग्णांना अर्थसहाय्य करण्याचा निर्णय त्यांच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय देणारा आहे. राज्यात पूर्वीही मुख्यमंत्री निधीतून गोरगरीब रूग्णांना अर्थसहाय्य मिळत असे. मात्र त्याचे प्रमाण खूपच कमी होते. देवेंद्रजींनी अधिकाधिक रूग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य कसे मिळेल याकडे लक्ष दिले. गेल्या पावणे पाच वर्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 56 हजारांहून अधिक रूग्णांना साडे पाचशे कोटी रूपयांची मदत देण्यात आली आहे. यावरून या योजनेची अंमलबजावणी किती कार्यक्षमपणे झाली याचा अंदाज येऊ शकतो. एखादी योजना जाहीर करून देवेंद्रजी थांबत नाहीत. त्या योजनेची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने चालू आहे याचा आपल्या पद्धतीने ते आढावा घेतात. योजनेच्या प्रगतीचा आढावा स्वत: मुख्यमंत्रीच सातत्याने घेत असल्याचे दिसल्यावर संबंधित यंत्रणा सतर्क राहते. 
देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला या सगळ्या गोष्टी कशा जमतात, असे आश्‍चर्यजनक कुतवल मला सतत वाटत राहते. हा माणूस रात्री दीड-दीड वाजेपर्यंत काम करत राहतो. परत दुसर्‍या दिवशीही त्याच उत्साहाने स्वत:ला कामात गुंतवून घेतो. हे पाहिल्यावर हा माणूस निव्वळ चमत्कार आहे, याची खात्री पटते. एकाचवेळी अनेक गोष्टींचे व्यवधान या माणसाला कसे ठेवता येत असेल, या मी अनेकदा विचार करत राहतो. कोणत्याही विषयाचे, प्रश्‍नाचे पटकन आकलन करून घेऊन त्यावर तोडगा काढण्याची देवेंद्रजींची शैली आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे एखाद्या विषयाचा कागद गेला की त्याची सखोल माहिती या माणसाला काही क्षणात होते मुख्यमंत्री म्हणून काम करताना ते आपल्या सहकार्‍यांवर विश्‍वास ठेवतात. आपले निर्णय कधीच सहकार्‍यांवर लादत नाहीत. सहकार्‍यांचे म्हणणे मंत्रिमंडळ बैठकीत व्यवस्थित जाणून घेतात. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत कायम खेळीमेळीचे वातावरण असते.
राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांना अनेक गोष्टींकडे सतत लक्ष ठेवावे लागते. हे करत असताना त्यांचे राजकीय स्थितीकडे बारकाईने लक्ष असते. माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार उभे राहणार असतील तर तुम्हालाच उभे राहावे लागेल, असे मला त्यांनी सांगितले होते. मात्र पवार उभे राहणार नसतील तर कोणाला उमेदवारी द्यायची याचा पर्यायही त्यांच्या डोक्यात तयार होता. माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा आणि तयारीचा ते जातीने आढावा घेत होते. या काळात मला देवेंद्रजींमधील धुरंधर राजकारण्याचे जवळून दर्शन घडले. कोणता डाव केव्हा खेळायचा हे देवेंद्रजींनी लोकसभा निवडणुकीच्या काळात अनेकदा दाखवले. राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी दूरदृष्टी, त्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्याची धडाडी त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारकडे प्रलंबित असणारे प्रश्‍न सोडविण्याची हातोटीही त्यांच्याकडे आहे. त्यांच्या या सर्व गुणांसोबत ईश्वर त्यांना महाराष्ट्राच्या विकासासाठी अविरतपणे कार्य करण्याची दृढशक्ती, उत्तम आरोग्य देवो हीच या वाढदिवसानिमित्त शुभकामना !

    
सुभाष देशमुख