जगात सर्वात सोपी, सर्वात जवळची, आपले विचार चटकन् आणि मुद्देसूद पटवून देण्यासाठी सतत आपल्याशी मैत्र करणारी अशी आपली मातृभाषाच असते, असं अनेक भाषातज्ज्ञांनी म्हटलेलं आहे आणि मला वाटतं ते शंभर टक्के खरं आहे. याचा अनुभव आपण सगळ्यांनीच घेतला आहे. प्रत्येकाला आपली मातृभाषा प्रिय असते, कारण कळायला लागल्यापासूनच मातृभाषा त्या बाळाला वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान द्यायला लागते आणि मग ते बाळ हळूहळू समृद्ध व्हायला लागतं. रवींद्रनाथ टागोरांनी एके ठिकाणी म्हटलंय की, मातृभाषेतून शिक्षण घेतलेली मुलं प्रगल्भ असतात’.

आज जर आपण पाहिलं तर जगातल्या सगळ्याच मातृभाषांवर इंग्रजी या जागतिक भाषेनं कुरघोडी केल्याचं दिसून येतंय. गल्लीबोळात इंग्रजी शाळा निघाल्या आहेत. त्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी हजारो रुपये देऊन प्रवेश घ्यायला लांबच्या लांब रांगा लागताहेत. त्या शाळेचे अर्ज घेण्यासाठी रात्रीपासून रस्त्यावर पथारी पसरून लोक रांगेत बसलेले, झोपलेले असल्याच्या बातम्या आपण वाचतो आहोत. सोलापूर ते पुणे या हुतात्मा एक्स्प्रेसमध्ये तर इंग्रजाळलेली  मराठी बोलणारी ९९% मुलं आपल्याला दिसतील. मराठी बोलणं कमीपणाचं मानलं जातंय. मराठी बोलणारा गावंढळ, बावळट असं समजलं जातंय. एखादा मुलगा वा मुलगी उत्तम मराठी (साहित्यिक मराठी नव्हे) बोलत असेल तरी त्याला  वा तिला चिडवलं जातं, 'ही मराठी आम्हांला कळत नाही' असं सुनावलं जाऊन टोमणे मारले जातात. कळत नसलं तरी, इंग्रजी पुस्तकं वाचण्याचं वेड बाढत चाललंय. (अर्थात जर उत्तम इंग्रजी कळत असेल, तर आवर्जुन वाचायला हवं पण केवळ आम्हीपण इंग्रजी वाचतो हा अट्टहास असणं हास्यास्पद ठरेल.) या सगळ्या पाश्र्वभूमीवर छोट्या गावातले, तालुक्यातले, वाडी- वस्त्यावरचे विद्यार्थी गोंधळून  जाताहेत.‘आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेतलं तर बाहेरच्या जगात तुमचा निभाब लागणार नाही' असं त्यांच्या मनावर बिंबवलं जातंय आणि मग म्हणून इंग्रजी समजत नाही, मराठी पण उत्तमरीतीने शिकवणारे नसल्याने दोन्ही भाषांत या मुलांची प्रगती खुटत चालली आहे.

म्हणून मला वाटतं ज्या भाषेचे संस्कार तुमच्यावर झाले आहेत, त्या मायमराठीला आधी नीट जाणून घ्या. स्वत:च्या भाषेतून तुम्ही जेवढे सहज व्यक्त होता तेवढे इतर भाषेतून नाही, म्हणून मातृभाषा सर्वार्थाने आत्मसात करा आणि मग जगाची जी भाषा ती इंग्रजीपण शिका. इंग्रजीसाठी आपल्या भाषेचा अपमान करू नका. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक भाषेला आपला म्हणून एक लहेजा असतो, रंग - रूप - गंध असतो, खास वैशिष्ट्य असतं, लावण्य असतं. तेव्हा सगळ्याच भाषांचा आदर करा. शिकता येतील तेवढ्या भाषा शिका. जेवढ्या जास्त भाषा तुम्हाला येतील तेवढे त्या त्या भाषेतल्या लोकांशी तुमचे अनुबंध जुळतील, तुमच्या अनुभवाचं विश्व विस्तारेल, ओळखी वाढतील. असे म्हणतात की, सहा वर्षापर्यंतचं मूल एकाच वेळी चार - सहा भाषा उत्तमरीतीनं आत्मसात करतं. तेव्हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलाला घालत असाल, तर त्याला मराठीही उत्तम यायला हवं याची काळजी घ्या. धेडगुजरी मराठी वा इंग्रजीचे संस्कार करण्यापेक्षा त्या त्या भाषेचं उत्तम ज्ञान त्याला मिळावं असा प्रयत्न करा. इंग्रजीवर प्रेम करायला शिकवताना मराठीचा अपमान वा दुस्वास करायला शिकवू नका. तुम्ही स्वतः उत्तम मराठी बोलण्याचा प्रयत्न करा. घरात तरी निदान मराठी बोलण्याचा सराव ठेवा. सोन्या, मिल्क पितो का? बनाना खाशील? चल go आणि Sleep बघू लवकर असं संभाषण करू नका. झोप, दूध, केळी असे मराठीतले शब्द त्याला कळू द्या ना!

एक खरं आहे की, जगात जर तुमचा प्रभाव पाडायचा असेल, तर आपली मातृभाषा-मराठी बरोबर इंग्रजी आली पाहिजे, कारण ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीकडे पाहिलं जातं. मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी विद्वान प्रयत्न करताहेत.अलीकडेच न्यायालयाचं कामकाज मराठीतून व्हायला हवं असा आदेश काढल्याचं मी वाचलं. नुकतेच १२ वी शास्त्र विषयातील एका विद्यार्थ्यांने शास्त्राची परीक्षा मराठीतून देण्याचा निर्णय घेतला आणि शिक्षण विभागाला राज्यभरातून या एकमेव विद्यार्थ्यांसाठी शास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका मराठीतून काढावी लागली. याचा अर्थ एखाद्याला जर मराठीतून एखाद्या विषयाची उत्तरपत्रिका द्यायची असेल, तर तशी देता आली पाहिजे, पण जर विज्ञानाची भाषा सर्वार्थाने समृद्ध अशी इंग्रजी असेल, तर मात्र अडचणी निर्माण होतील. याशिवाय ज्या मोठमोठ्या संस्था आहेत, उद्योगधंदे आहेत तिथे मुलाखतीसाठी जाताना आपला गावातला मराठी मुलगा इंग्रजीतून मुलाखत देताना गोंधळलेला असतो. त्याच्याकडे आत्मविश्वास नसतो. अशा वेळेस ज्ञान असूनही, कामाची तयारी,शिक्षण व उत्तम गुण असूनही केवळ इंग्रेजी बोलता न आल्याने हातची संधी घालवून बसतो. तेव्हा मला मनापासून वाटतं की असं व्हायला नको.

मायमराठीवर प्रेम करताना, इंग्रजीचा दुस्वास नका करू, तर तिच्याबरोबर मैत्री करा. तिलाही आपलंसं करा. फक्त तिला आपलं करताना आपल्या मातृभाषेला-मराठीला सर्वार्थानं नीट समजून घ्या. जगभरातल्या मराठी भाषकांच्या उत्कर्षासाठी, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण सगळेच मनापासून प्रयत्न  करूया.

आपला नम्र,