नमस्कार,
वर्षभराच्या ३६५ दिवसांपैकी जवळ जवळ सगळे दिसव दिनविशेषात मोडतात. म्हणजे बघा, फादर्स डे, मदर्स डे, फ्रेंडशिप डे, ब्रदर्स डे अशा जवळपास सगळ्या नात्यांचे आणि त्या व्यतिरिक्त सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आदि विषयांना धरूनही स्पेशल डे साजरा केला जातो. आता जे जे दिवस साजरे केले जाताहेत ते या पाच-पंचवीस वर्षापासून अधिकतेने म्हणजे जाणवण्या इतपत साजरे होताहेत. खरं तर ही सगळी नाती, सामाजिक-शैक्षणिक आदि क्षेत्रातल्या महत्वाच्या घडामोडी किंवा त्याविषयीची जागरूकता या पाच-पंचवीस वर्षापूर्वीची असेलच की. हा जरा त्याचं प्रमाण कमी-अधिक असेल कदाचित. पण मग असे दिवस आवर्जून का साजरे करावे लागताहेत. आता आई-वडील, मित्र, कुटुंब, समाज यांचे स्थान आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचं असतच. खरं पहायला गेलं तर रोजचा दिवसच या नात्यांपासून तर सुरु होतो, आई-वडील तर आपल्या आयुष्यातलं अनमोल नातं. ज्यांचे ऋण सात जन्मातही फिटणार नाहीत. पण मग असं कां झालं की हे खास दिवस आठवणीनं वर्षातून एकदा साजरे होऊ लागले.
मला फार काही कळत नाही पण माझं जे चिंतन आहे, मी जे आजुबाजुला पाहतो, वाचतो, ऐकतो त्या वरून मला असं वाटतं की, पाश्चात्य देशात १७-१८ वर्षाची मुलं आई-वडिलांपासून स्वतंत्र होऊन आपापला चरितार्थ चालवण्यासाठी घराबाहेर पडतात. मग पडेल ते कष्ट करत पैसा कमावतात, शिक्षण घेतात आणि स्वत:ला सिद्ध करतात. हे सगळं करत असताना आई-वडिलांशी असलेली अॅटेचमेंट कमी होत असेल का ? स्वत:ला सिद्ध करण्याच्या नादात आई-वडिलांकडे दुर्लक्ष होत असेल का ? आणि मग म्हणून निदान वर्षातला एक दिवस तरी नातेसंबधातली निसटलेली वीण सांधण्यासाठी, आई-वडिलांना मुलांचा सहवास मिळावा यासाठी हे दिवस साजरे केले जात असावेत. बाकिच्या नात्यांविषयी असाच याच बाजूने विचार करता येईल.
पण आपला, भारतीयांचा विचार केला तर आपली एकत्र कुटुंब पद्धती. एकमेकांच्या साहाय्यानं, सहकार्यांनं, प्रेमानं कुटुंब आनंदानं रहायचं. यामुळे नात्यातला पिळ घट्ट असायचा. कुटुंबातल्या नात्यांविषयी आत्मियता, श्रद्धा असायची. पण मग पुढे पुढे एकत्र कुटुंब पद्धती संपत चालली. ‘हम दो हमारे दो’ संस्कृतीचा उदय झाला आणि ‘वसुधैव कुटुंबम्’ या संकल्पनेतून आपण ‘मी आणी माझे कुटुंब’ यात गुरफटले गेलो. या छोट्याश्या चौकोनी कुटुंबात आई-वडिलांना स्थान नाही तर मग बाकीची नाती तर नांवच नको. मग यातून वृद्धाश्रमांची संख्या वाढायला लागली. पाश्चात्य देशात जाऊन आधी शिकणं आणि मग कायमचं वास्तव्य तिथच या धारणेमुळं खस्ता खाल्लेले आई-वडील भारतात एकटे रहायला लागले. कुटुंब, प्रेम, आत्मियता, श्रद्धा, त्याग या सगळ्या बाबी फक्त भाषेच्या लिपीत सापडायला लागल्या.
खरंतर या अशा सगळ्या विचारांनी मन अस्वस्थ होतं. आज मी हे सगळं बोलतोय कारण गेले कित्येक महिने माझ्या मनात एक विचार घोळतोय. मला असं वाटतं की आज-काल समाजातून ‘माणुसकी’ संपत चालली आहे. माणुसकीचे आपण गोडवे गायचो. सगळ्यात श्रेष्ठ धर्म म्हणजे माणुसकी हे आपल्या जगण्याचं मूळ स्त्रोत आहे त्याचाच ऱ्हास होतोय की काय असं वाटायला लागलं. पूर्वी असं म्हंटलं जायचं की भुकेला असेल तर तुमच्या ताटातली अर्धी भाकरी त्याला द्या. अडला-नडला आला तर त्याला मदत करा. पण आज ही शिकवण देणारी माणसच घरात नाहीत. कारण घरात आजी-आजोबा नाहीत. त्यांच्या जगण्याच्या समृद्ध अनुभवातून हे सुविचार घराघरात, समाजात रुजले जायचे.
समाजात एखादी घटना घडते. एखाद्याच्या कुटुंबातला कर्ता ऐन तारुण्यात जातो. ते घर उघडं पडतं. घरात छोटी कच्ची बच्ची असतात. म्हातारी माणसं असतात. पण कुटुंबकर्त्याच्या निधनानं त्या घरातली तरूण सून, लहान मुलं कामाला बाहेर पडतात. तेव्हा त्या कुटुंबाविषयी आपल्या मनात करुणा दाटली पाहिजे. याउलट त्यांच्याकडून मन मानेल तसं राबवून घेतले जाते. शाळेत जाणाऱ्या वयातली ती मुलं कामं करायला लागतात. शाळा सुटते त्यांची अशा वेळेस समाजाचं कर्तव्य आहे की त्या कुटुंबाला सन्मानाने उभं कसं करता येईल याचा विचार करून कृती करण्याची. खरं पहायला गेलं तर जास्त काही करावं लागत नाही. तुमची संपत्ती, तुमचा पैसा जास्त खर्च करायचीही गरज नसते पण तुमच्या आमदनीतला एखादा आणा जरी अशा कुटुंबाच्या सहकार्यासाठी दिलात तरी त्या कुटुंबाला मोठा आधार वाटतो. ही वानगीदाखल एक घटना सांगितली. पण समाजात अशा कितीतरी घटना घडताहेत. कुटुंब अडचणीत सापडलं की समाजाचंही स्वास्थ्य बिघडतं. म्हणून म्हणतो माणुसकी जपा. ही एकमेव गोष्ट आहे जी जगण्याचं सार्थक करते. माणसाने माणसाप्रमाणे वागलं पाहिजे. प्राण्यांमध्ये सर्वश्रेष्ठ माणूस आहे म्हणून ईश्वर जेव्हा माणसाला जन्माला घालतो तेव्हा त्याने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवता आला पाहिजे. आपल्यातली माणुसकी जिवंत ठेवता आली पाहिजे. आणि आपण माणूस आहोत, माणुसकी हा आपला सर्वश्रेष्ठ धर्म आहे. याची आठवण सतत आणि सातत्यानं जागति ठेवायला पाहिजे. नाहीतर ‘माणुसकी दिवस’ अर्थात ‘ह्यूमन डे, साजरा करण्याची सुरुवात करावी लागेल.
गेल्या संवाद वर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या, पसंती दिली. त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. तुमचा हा प्रतिसाद माझं चिंतन वाढायला मदत करतो. आजचा संवाद आवडला का ? याविषयी जरूर मला कळवा.
- सुभाष देशमुख
0 Comments
Post a Comment