केल्याने पर्यटन.... मनुजा चातुर्य येतसे फार! या उक्तीमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे पर्यटन ही अशी गोष्ट आहे जी मानवी जीवनाला विविध प्रकारे अनुभवी, समृद्ध बनवत असते, आपल्याला आनंद देत असते. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्येही पर्यटन मोलाची भूमिका बजावते. आपली भारतभूमी, महाराष्ट्राची भूमी पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय समृद्ध आहे. विशेषतः सोलापूर जिल्ह्याचा विचार करता विविध दृष्ट्या पर्यटनासाठी अनुकूल असणारा हा जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने आणखी विकसित कसा करता येईल यासाठी आम्ही नेहेमीच प्रयत्न करीत आहोत. 

सोलापूर जिल्हयाच्या विकास घडवून आणण्यासाठी जी पावले आम्ही उचलत आहोत त्यापैकी एक म्हणजे येथिल पर्यटन जागतिक पातळीवर नेणे. सोलापूर जिल्ह्याचे ऐतिहासिक, धार्मिक महत्व मोठे आहे. चालुक्य, राष्ट्रकूट, यादव व बहामनी राजवटीच्या खाणाखुणा आजही येथील गड किल्ले व अन्य ऐतिहासिक स्थळांमध्ये दिसून येतात. वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण अशा अनेक स्थानांची माहिती आजही पर्यटकांपासून अलिप्त असल्याचे समजते. मराठीमधला पहिला शिलालेख असणारे हत्तरसंग कुडल, वैशिष्ट्यपूर्ण बांधणीचा नळदुर्ग किल्ला, धाराशीव लेणी व अशी अनेक स्थाने हे या जिल्ह्याचे मोठे वैभव आहे. ते सर्वांपर्यंत पोहोचविणे अतिशय आवश्यक आहे. सोलापूर जिल्ह्याचे धार्मिक महत्वही मोठे आहे. ग्रामदैवत सिद्धेश्वर तसेच जिल्हा व परिसरातील अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर यांसह अनेक धार्मिक क्षेत्रात भाविकांचा नेहेमीच मोठा ओघ असतो. या क्षेत्रांच्या आसपास अन्य पर्यटन स्थळेही मोठ्या प्रमाणावर आहेत. यांचा विकास साधताना भाविकांची सोय व पर्यटन क्षेत्राची प्रगती असा दुहेरी संगम साधणे यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. 

सोलापूर जिल्हा आपल्या विशिष्ट शेती उत्पादने व खाद्य पदार्थांसाठी जगभर प्रसिद्धी पावला आहे. इथल्या मातीमध्ये पिकलेल्या ज्वारीच्या अप्रतिम भाकरी, चटणी, भरीत, हुरडा, फळे, ऊस चाखण्यासाठी पर्यटक आकर्षित होत असतात. त्यांना उत्तम सुविधा पुरविणे व त्यायोगे कृषीक्षेत्राचाही विकास साधणे हे सोलापुरास नवी ओळख प्राप्त करून देईल. 

पर्यटन क्षेत्राचा विकास सोलापुरातील अनेकांना उत्तम रोजगारही मिळवून देईल. शेती, विज्ञान, उद्योगांचीही प्रगती साधली जाईल. पर्यटन क्षेत्रामध्ये पारंपरिक कक्षा सोडून कृषी पर्यटन, वन्यजीव पर्यटन, वैज्ञानिक पर्यटन, वैद्यकीय पर्यटन यांसारख्या पर्यटनाच्या अन्य शाखांमध्येही मोठे बदल करून सोलापूरास पर्यटन क्षेत्रात अव्वल बनविणे हे माझे स्वप्न आहे.आपला नम्र,