भारतीय शासनव्यवस्था ही लोकशाही पद्धतीने चालते आणि लोकशाही यशस्वी बनण्याचा पाया म्हणजे सर्व नागरिक, सर्व मतदार. आज एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना माझ्या मतदारांचे महत्व मी जाणतो. नेता जरी एक व्यक्ती असली तरी शासन उभे करण्यात मतदारच मोठी भूमिका बजावतात. आपल्या संविधानाने वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकास मतदानाचा अधिकार दिला आहे. येत्या काही वर्षांमध्ये भारत हा जगातील सर्वात तरुण देश ठरणार आहे. तृतीय सहस्रकातील पहिली पिढी या वर्षी मतदानाला पात्र ठरणार आहे. मतदाराने समजून उमजून विचारपूर्वक केलेल्या मतदानानेच शासन बनते. शासन सुरळीत चालावे, नागरिकांच्या समस्या सोडविल्या जाव्यात, देशाचा विकास व्हावा, प्रगती व्हावी हे तर सर्वांनाच वाटत असते. परंतु दुर्दैवाने, काही नागरिक आजही मतदानाची प्रक्रिया गांभीर्याने घेत नाहीत. आपले एक मत इतिहास घडवू शकते व बिघडवूही शकते. योग्य व सक्षम उमेदवारास आपल्या नेतेपदाची सूत्रे देण्यासाठी आपले अमूल्य मत देणे अत्यंत गरजेचे आहे. आगामी काळात नव्या पिढीचे मतदान निर्णायक ठरणार आहे. खोटी आश्वासने, चुकीचे निर्णय यास बळी पडून त्या डळमळीत पायावर सरकार उभे राहिले तर ते सर्व प्रामाणिक मतदारांचे, पर्यायाने या समाजाचे मोठे नुकसान ठरेल. हे टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी सुजाणपणे मतदानासाठी पुढे येणे आवश्यक आहे. आपल्या नव्या पिढीचे मतदार हे डिजिटल तंत्रज्ञानाने सिद्ध आहेत. सुशिक्षित देखील आहेत. त्यांच्याकडे विचारशक्ती, दूरदृष्टी आहे. आताच्या शासनाच्या सक्षमपणे घेतलेल्या निर्णयांचा परामर्श, अभ्यास करण्याचे सामर्थ्य नव्या पिढीच्या या मतदारांमध्ये आहे असे मला वाटते. देशाचे उज्ज्वल भवितव्य आखण्याचे आमचे स्वप्न या पिढीच्या नजरेत मला कायमच दिसते. सर्वच मतदारांनी सारासार विचार करून, योग्यायोग्यता जोखून आपला लोकप्रतिनिधी निवडावा, आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी सर्वांनी समर्थ उमेदवारास मतदान करण्याचा निर्णय घ्यावा. हा या मतदार दिवसाच्या निमित्ताने संकल्प करावा.आपला नम्र,