मराठा आरक्षण विधेयक मंजूर होणे ही एक मोठी ऐतिहासिक अशीच घटना म्हणावी लागेल.

मराठा आरक्षण उपसमितीचा सदस्य म्हणून काम करत असताना जनतेच्या मागण्या, सूचना सरकरपर्यंत पोहोचवण्यात जो काही खारीचा वाटा मी उचलू शकलो त्याचा मला अभिमान आहे.

दिलेला शब्द पाळत सरकारने मराठा आरक्षण विधेयक मंजूर केले. हा प्रवास आपण सर्वांनीच बघितला, अनुभवला. सर्वांच्या सहकार्याने, मेहनतीने हे आरक्षण लागू झाले खरे, परंतु पुढे काय? कोणतेही आरक्षण लागू होताना त्या त्या समाज घटकांचे कल्याण व्हावे हाच तर अंतरिम उद्देश असतो. आरक्षण लागू झाले म्हणजे उद्देशाची पूर्तता झाली असे नव्हे. आत्ता लागू झालेल्या या मराठा आरक्षणाचा समाजातील गरजूंना योग्य लाभ होणे हेही तेवढेच महत्वाचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे. समाजाच्या मूलभूत गरजांपैकी शिक्षण व रोजगार या दोन महत्वाच्या गरजा. पुढे जाण्यासाठी, प्रगती होण्यासाठी चांगले शिक्षण मिळणे, नोकरी आणि व्यवसायाच्या चांगल्या संधी प्राप्त होणे गरजेचे आहे.

हे आरक्षण विधेयक मराठा समाजातील होतकरू तरुणांसाठी एक उत्तम आधार ठरणार आहे. तरुणांनी पुढे यावे, आपल्यामधील दुर्बल स्थाने शोधून त्यांवर मात करावी आणि आपल्याला सामर्थ्य देणार्‍या बाबी कोणत्या हे ओळखून योग्य मार्गाचा अवलंब करावा. मराठा समाजातील तरुणांचे संघटन करून त्यांना शिक्षण व रोजगाराच्या उत्तम संधी मिळाव्या यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे.

मराठा समाजातील तरूणांकडे कौशल्य आहे, बुद्धिमत्ता आहे, इच्छाशक्ती आहे. परंतु काही बाबींमुळे या तरुणांची प्रगती खुंटते आहे का? योग्यता असूनही काही कारणांमुळे अडचणी उत्पन्न होत असल्या तर त्यावर मात करण्यासाठी आरक्षणामुळे एक आशेचा किरण दिसू लागला आहे असे म्हणावयास हरकत नाही. आता वेळ आहे या आरक्षणाचा योग्य लाभ करून घेत प्रगतीच्या मार्गावर चालण्याची. आज मी एक वचन देतो, फक्त मराठाच नाही, तर महाराष्ट्रातील संपूर्ण युवा पिढीच्या पाठीशी मी कायम एक भक्कम आधार बनून उभा राहीन.

एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा, या आरक्षणाचा उपयोग कुबड्या म्हणून नाही, तर प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारी शिडी म्हणून करायचा आहे.

आपला नम्र,