छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र आणि मराठी साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणजे छत्रपती श्री संभाजी महाराज. अवघ्या महाराष्ट्राचा उर अभिमानाने फुलून यावा अशी ही दोन नावे. आज छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन. शिवछत्रपतींनी स्वराज्य उभे केले व संभाजी महाराजांनी त्यांचा वारसा पुढे चालवीत स्वराज्याचा हा वटवृक्ष जपला, मोठा केला. केवळ नाव उच्चारले तरी नम्रतेने मान तुकवावी असे संभाजी महाराजांचे उत्तुंग व्यक्तिमत्व. उत्कृष्ट राज्यकर्ता कसा असावा याचा आदर्श म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. रयतेचे हित जपणारे, प्रसंगी कठोर निर्णय घेणारे, आपल्या तत्वांशी तडजोड न करणारे, धैर्याने आणि असामान्य शौर्याने शत्रूंशी लढा देणारे, आपल्या कार्यकाळातील सर्व युद्धांमध्ये विजय प्राप्त करणारे आणि या सर्वाबरोबरच साहित्यिक अन् कवी असणारे महाराष्ट्राचे शंभू राजे.

आजची तरुण पिढी इतिहासामध्ये रस घेते आहे, महाराजांना आदर्श मानते आहे हे चित्र निश्चितच चांगले व आशादायक आहे. परंतु, महाराजांच्या नावाचा केवळ जयघोष केला म्हणजे आपण महाराजांचे भक्त झालो असे नव्हे, तर आज वेळ आली आहे ती महाराजांचा आदर्श घेऊन पुढे जाण्याची, त्यांच्या वागणुकीवरुन प्रेरणा घेऊन प्रत्यक्ष वाटचाल करण्याची. महाराजांचा वारसा घेऊन आज आपल्याला पुढे जावयाचे आहे. एक उत्तम समाज घडविण्यासाठी, आपल्या राष्ट्राला उन्नतीच्या, यशाच्या मार्गावर नेण्यासाठी महाराजांचे चरित्र आपण अंगिकारले पाहिजे.

राजकारण, समाजकारण करताना वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून, रयतेचे हित लक्षात घेऊन शासन करण्याचा धडा महाराजांचे चरित्र आपल्याला देते. हाच आदर्श डोळ्यापुढे ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी माझी वाटचाल सुरू आहे. आपल्या सर्वांच्या साथीने, महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्यात मी व भारतीय जनता पक्षाचे हे सरकार नक्कीच यशस्वी होईल हा माझा विश्वास आहे.

या राज्याभिषेक दिवशी छत्रपती श्री संभाजी महाराजांना मानाचा मुजरा!

आपला नम्र,