गड्डा यात्रा |
समस्त सोलापूर वासीयांचे श्रद्धास्थान म्हणजे सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थान. दर वर्षी प्रमाणे या वर्षीही मोठ्या उत्साहात गड्डा यात्रेचा प्रारंभ झाला आहे. सर्व सोलापूरकरांच्या मनात या मंदिराचे आणि या यात्रेचे एक खास स्थान आहे. नंदिध्वजांची मिरवणूक निघते तेव्हा वातावरणात एक वेगळाच उत्साह पाहावयास मिळतो. फक्त सोलापूरच नव्हे तर दूर दूरहून भाविक या यात्रेस उपस्थित असतात. हे चित्र पाहून माझ्या मनात नेहेमीच एक कुतूहल जागे होत असते. या सर्वांना एवढी ऊर्जा, एवढी शक्ती कोठून मिळते? कोणती गोष्ट या यात्रेला एवढी सफल बनविते?
याचे उत्तर संत श्रेष्ठ श्री सिद्धरामेश्वर यांच्या तेजस्वी विचारांमधून मिळते असे मला वाटते. सुमारे नऊशे वर्षे अव्याहतपणे ही यात्रा सुरू आहे. समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी स्थापन केलेली देवस्थाने, सुरू केलेले उत्सव, त्यांचे विचार आजही आपल्याला चैतन्य देतात. नव्या व जुन्या पिढीचे लोक मोठ्या उत्साहाने या यात्रेत सहभागी होतात. अत्यंत शिस्तबद्ध स्वरुपात संपन्न होणारी ही यात्रा म्हणजे धार्मिक विधी आणि परंपरांसह समाजातील एकीचेही प्रतिक ठरते आहे. सर्व जाती धर्मांचे लोक यात्रेमध्ये उत्साहाने आणि श्रद्धेने सहभागी झाल्याचे पाहावयास मिळते. विरशैव लिंगायत संप्रदायातील श्रेष्ठ संत, बाराव्या शतकातील युग पुरुष, श्री सिद्धरामेश्वर यांचे विचार, त्यांचे कार्य आजही आपणास प्रेरणा देते. आपण नेहेमीच म्हणत असतो, "काळ बदलत चालला आहे". खरे आहे. आज तंत्रज्ञानाने प्रगतीची अशी काही शिखरे गाठली आहेत की आपणास गगनही ठेंगणे वाटावे! आपला समाज प्रगती करीत आहे, पुढे जात आहे परंतु आपल्या मातीशी जोडलेली नाळ, इथले संस्कार आजही आपले महत्व टिकवून आहेत. हे संस्कार, ही नीती एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होतच राहते.
आत्मविदयेला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी अनेक शिष्यांना स्पष्ट व सुबोध पद्धतीने मार्गदर्शन केले. आत्मविद्या हा त्यांच्या शिकवणीचा मुख्य गाभा. विद्यार्थ्यांनी क्षणभंगुर अशा भौतिक गोष्टींकडे लक्ष न देता अंतर्मुख होऊन स्वत:च्या अंतर्मनात डोकावले पाहिजे. क्षणिक मोहाचा त्याग करून शाश्वत सत्याचा स्वीकार केला पाहिजे ही शिकवण त्यांनी दिली. युवा पिढीने अंगिकारावे असेच महाराजांचे विचार व चरित्र आहे.
एक वेगळीच ऊर्जा देणार्या 'हर्र बोला, सिद्धेश्वर महाराज की जय' या जयघोषाने सारा आसमंत भरून जावो. यात्रेची, श्रद्धेची, एकीची ही परंपरा अशीच अबाधित राहो.
आपला नम्र,
आपला नम्र,
0 Comments
Post a Comment