स्त्री हे शक्तीचे, लक्ष्मीचे स्वरूप.
एकविसाव्या शतकात महासत्ता होण्याकडे आपल्या भारताची वेगाने वाटचाल सुरू आहे. विविध क्षेत्रांमध्ये जागतिक पातळीवर यशाची नवनवी शिखरे गाठली जात आहेत. अभिमानाची बाब म्हणजे या सर्व क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या भारतीयांमध्ये स्त्रियांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. हा स्त्रीशक्तीचा गौरव म्हणावयास हवा. ही झाली आपल्या देशातील महिला सबलीकरणाची उज्वल बाजू. दुर्दैवाने आजही काही भागात स्त्रीभ्रूण हत्या होताना दिसत आहेत. केवळ ग्रामीण अथवा अशिक्षित समाजात नव्हे तर शहरी आणि सुशिक्षित समाजातही हे प्रमाण मोठे असल्याचे दिसते. ही निश्चितच दुःखद बाब म्हणावी लागेल. स्त्रीभ्रूण हत्या संपूर्णतः रोखण्यासाठी समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. कन्येचा जन्म हे ओझे न वाटता मुलीच्या जन्माचा आनंदसोहळा साजरा व्हावयास हवा. मुलगा - मुलगी या भेदाचे जेव्हा मनातून उच्चाटन होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने समानता आली असे म्हणता येईल.

समाजाची ही मानसिकता बदलण्यासाठी शासनातर्फे, स्वयंसेवी संस्थांतर्फे आज अनेक विविध योजना राबविल्या जात आहेत. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी खिलाओ या घोषणेसह स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्याचे, मुलींना शिकविण्याचे व क्रीडाक्षेत्रामध्ये पुढे येण्याचे आवाहन केले आहे. केंद्र शासनातर्फे सुकन्या समृद्धी सारख्या योजनाही राबविल्या जात आहेत.

महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये कन्यादान अनुदान व कन्यारत्न भेट या योजना राबवित आहोत. जिल्ह्यामध्ये जन्माला आलेल्या बलिकांच्या नावाने त्वरित रुपये २००० या रकमेची ठेव सुकन्या योजने अंतर्गत भेट देण्यात येते. महिला शिक्षण व रोजगारासाठीही आम्ही अनेक योजना राबवित आहोत, तसेच वधूच्या पालकांना कन्यादान अनुदान देण्याची व्यवस्थाही आहे. या योजनांचा लाभ सर्व गरजूंना मिळावा यासाठी मी स्वतः नेहेमीच प्रयत्नशील आहे.

आज राष्ट्रीय कन्या दिवस. या निमित्ताने स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याची, आपल्या मुलींना उत्तम व उच्च शिक्षण देऊन अधिक सक्षम बनविण्याची, त्यांना विचार व निर्णय स्वातंत्र्य देण्याची प्रतिज्ञा करूया. मुलगा व मुलगी यांना एकसमान वागणूक, शिक्षण व प्रगतीच्या समान संधी यातूनच एक सुदृढ व सशक्त समाज घडविला जाऊ शकतो.

आपला नम्र,