क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन...
स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले व अन्य सर्व थोर समाजसुधारकांचे आपण ऋणी राहावयास हवे. 

गेल्या काही वर्षात आपल्या भारत देशात शिक्षण, उद्योग, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात वेगाने विकास घडून येऊ लागला. या विकासात महिलांचे स्थान विशेष महत्वाचे राहिले आहे. 

२१ व्या शतकातील आजच्या समाजाकडे पाहिले असता स्त्रिया सर्वच क्षेत्रात आघाडीवर असल्याचे दिसून येते. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने विविध पावले उचलली गेलेली आपल्याला दिसून येतात. 

परंतु, दुर्दैवाने आजही आपल्या समाजात अनेक स्त्रियांना निर्णय स्वातंत्र्य नसल्याचे चित्र समोर येत आहे. शिक्षण किती व कोणते घ्यावे, नोकरी करावी की व्यवसाय यांसारख्या प्रश्नांपासून विवाहाचा निर्णय देखील स्त्रियांवर लादला जातो... 

आज समाजातील सुशिक्षित व सुसंस्कृत कुटुंबांमधून हे चित्र काही अंशी बदलताना दिसते खरे, परंतु अनेक घरात स्त्रियांना, मुलींना निर्णय स्वातंत्र्य मिळत नाही हे दुर्दैवी वास्तव आहे. निर्णय स्वातंत्र्य आणि आपल्या कुटुंबाचा सबळ पाठिंबा या दोन महत्वाच्या बाबी स्त्रियांना यशाकडे घेऊन जाण्यास महत्वाच्या ठरतील. यासाठी समाजाच्या सर्व स्तरांमधून प्रयत्न होणे गरजेचे आहे. शिक्षण, नोकरी - व्यवसाय, क्रीडा, राजकारण, तंत्रज्ञान, विज्ञान, साहित्य अशा सर्व क्षेत्रात जाऊ पाहणाऱ्या आपल्या कुटुंबातील स्त्रियांना प्रोत्साहन द्यावयास हवे. 

यातूनच आपण सावित्रीबाई फुले यांचे विचार व कार्य सातत्याने जिवंत ठेवू अशी माझी भावना आहे.

आपला नम्र,