आज स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती....

एक ती माता जिने असा पुत्र घडवला ज्याच्या शौर्यासमोर आज संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर हे विश्व नतमस्तक होते. आणि एक ते ज्यांनी भारतीय आणि भारतीय अध्यात्म यांच्या समोर संपूर्ण जगाला नतमस्तक व्हायला भाग पाडले...

राजमाता जिजाऊंच्या बद्दल काय किंवा स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल काय आपण काही बोलावे याची आवश्यकता नाही, ते सर्वानाच ज्ञात आहेत. परंतु त्यांच्या सिद्धांतांवर, तत्वांवर आपण किती प्रमाणात चालत आहोत हा एक प्रश्न आज प्रत्येकाने स्वतःला विचारावा असे मला वाटते.


एक राजा घडवत असताना त्याला सुयोग्य शिकवण देऊन, असीम धैर्य त्याच्यात निर्माण व्हावे म्हणून त्यागाच्या सर्व सीमा पार करणाऱ्या जिजाऊ चा लढाऊ बाणा हे सर्व शिवाजी महाराजांच्या जडणघडणीतले महत्वाचे टप्पे ठरले. पुत्रप्रेम, माया या सर्वांच्या वर जिजाऊंनी कर्तव्याला प्राधान्य दिले. ही जिद्द आता दिसून येते का...


शिकागो मध्ये गेले असता जे अजरामर भाषण स्वामी विवेकानंदांनी दिले त्या साठी असलेली विद्वत्ता काही एका रात्रीत तयार झाली नाही. सातत्याने केला गेलेला अभ्यास, अथक परिश्रम, अचाट वाचन, यातुन निर्माण झालेली प्रगल्भता होती ती. आताच्या गुगल काळात रमलेल्या पिढीमध्ये ही जिद्द, ही चिकाटी थोड्याफार प्रमाणात कमी झाली आहे का.... वाचन, अध्यात्म यापासून ही पिढी लांब जाते आहे असे फार वाटते.

आज युवा दिन साजरा केला जातो पण याचे कारण किती युवकांना ठावूक आहे...

आज स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी प्रार्थना करतो की ही जिद्द, ही चिकाटी सर्व भारतीय तरुण तरुणींना लाभावी, आपल्या भारत देशाची प्रगती यावरच अवलंबुन आहे...

आपला नम्र,