नुकतेच नानाजी देशमुख, प्रणव मुखर्जी व भूपेन हजारीका यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाले. भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार. अर्थातच हा पुरस्कार प्राप्त होण्याऱ्या व्यक्ती ही खरोखरी देशाची रत्नेच. आपल्या ऊत्तुंग कार्याने देशासाठी काही भरीव कामगिरी करणाऱ्या या रत्नांचा सन्मान होत असतानाच देशापुढे त्या व्यक्तींच्या कार्याचा आदर्श उभा रहात असतो असे मला नेहेमी वाटते. 
देशहितासाठी झटणाऱ्या थोर व्यक्तिमत्वांच्या गौरवाने प्रत्येक सच्च्या भारतीयास आनंद होत असतोच. त्यातही आपल्या महाराष्ट्र भूमीतील राष्ट्रऋषी नानाजी देशमुख यांना या पुरस्काराने गौरविण्यात आल्याने मन आनंदाने भरून येते आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत जडणघडण झालेले नानाजींचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व. जनसंघाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यानंतर जनता पक्षाच्या मार्फत त्यांनी राजकरणातही भरीव कार्य केले. पुढ्यात मानाने आलेले केंद्रीय मंत्रिपद नाकारून त्यांनी असीम त्यागाचा धडा दिला. दीनदयाळ शोध संस्थान, चित्रकूट येथे स्थापन केलेले भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ, आरोग्यधाम, गोशाळा उद्यमिता विद्यापीठ, ग्रामोद्योग विद्यालय, आश्रमशाळा गुरुकुल, ग्रंथालय, मातृसदन, दंतचिकित्सा केंद्र ही यादी वाढतच जाईल परंतु खेडोपाडी, दुर्गम भागातील आदिवासी पाड्यांमध्ये, शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेल्या कार्याचे वर्णन करावयास शब्दही कमी पडतील. त्यांच्या अथक राष्ट्रसेवेपुढे मान नम्रतेने झुकते. कोणतीही कृती करताना देशहितास प्राधान्य द्यावे ही शिकवण आपल्याला त्यांच्या चरित्रामधून मिळते. आपले जीवन देशकार्यासाठी वाहून घेतलेल्या नानाजींनी वैद्यकीय संशोधनासाठी देहदान करून निधनानंतरही लोकोपयोगी कार्याचा आदर्श घालून दिला.     
नानाजींच्या भेटीचा योग ही माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय घटना. हे भाग्य मला लाभले ते माझे पिताजी श्री. सुरेशचंद्र देशमुख यांची इच्छा पूर्ण करताना. नानाजींच्या कार्याने प्रेरित होऊन पिताजींनी चित्रकूट येथे जाण्याची इच्छा व्यक्त केली व त्यानिमित्ताने नानाजींची भेट घडून आली. त्यांची ग्रामविकासाची अलौकिक संकल्पना जाणून घेत असतानाच सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गाव, तालुक्याच्या विकासातूनच संपूर्ण जिल्ह्याचा विकास शक्य आहे याची जाणीव मला झाली. आजचे माझे सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन या आंतरिक उर्मीतूनच निर्माण झाले आहे असे मला वाटते. 
त्यांच्या कार्याचे अनुसरण करत माझ्या हातून राष्ट्रसेवा, समाजसेवा घडत रहावी हीच इच्छा आज मनी येत आहे. ध्येयवादी, निस्वार्थी, अखंड राष्ट्रसेवेचे व्रत घेतलेल्या या तपस्वीस माझे त्रिवार नमन.

आपला नम्र,