अंतराळ विश्वात भारताचे नाव जगभर पोहोचविणाऱ्या भारताच्या सुपुत्री कल्पना चावला यांचा आज स्मृतीदिन. जिद्द महत्वाकांक्षा असेल तर स्त्रियांना अवकाशालाही गवसणी घालता येते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे कल्पना चावला. भारतीय वंशाच्या पहिल्या अंतराळवीर म्हणून त्यांचे नाव आज अजरामर झाले आहे. एका मोहिमेत त्यांचा झालेला अपघाती मृत्यू हा सर्वांनाच चटका लावून गेला. अंतराळ क्षेत्रात त्यांचे नाव सदैव स्मरणात राहील. प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली जावी अशीच त्यांची कारकीर्द आहे.
अंतराळवीर बनण्याचा त्यांचा हा प्रवास सोपा तर निश्चितच नव्हता. त्यांच्या जीवनाचा आलेख पाहिला असता या मेहनतीच्या, जिद्दीच्या खडतर प्रवासाची जाणीव होते. बऱ्याचदा आपल्या समाजात एक मानसिकता दिसून येते ती म्हणजे, केवळ शहरी भागातील, इंग्रजी माध्यमाच्या, सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा वातावरणातच विद्यार्थ्यांचे भविष्य घडते. परंतु आज आपल्यासमोर कल्पना चावला यांचे मोठे उदाहरण आहे. पंजाबमधील एका लहानशा गावात जन्म व प्राथमिक शिक्षण झालेल्या कल्पना यांनी आपले ध्येय निश्चित करीत मोठी झेप घेतली. मला मनापासून असे वाटते, प्रत्येक स्त्रीमध्ये अशी भरारी घेण्याचे बळ असतेच. गरज असते ती योग्य पाठबळ मिळण्याची.
आपल्या देशात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील प्रत्येक कन्येस उत्तम शिक्षण मिळावे, तिने स्वतःच्या पायावर उभे राहावे, सक्षम व्हावे तेव्हाच आपला संपूर्ण समाज सक्षम होईल. यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहेच, शासनातर्फेही विविध योजना राबविल्या जात आहेत. प्रत्येक कुटुंबानेही आपल्या लेकींना शिक्षणासाठी, त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पाठिंबा द्यावा. कल्पना चावला यांसारख्या महिलांकडून प्रेरणा घेत समाजाला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी आपण सर्व सज्ज होऊया.
त्यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली.

आपला नम्र,