वाचनाची आवड जपावी...वाचाल तर वाचाल !



आपला महाराष्ट्र नेहेमीच वाचन संस्कृतीसाठी नावाजला गेला आहे. अनेक श्रेष्ठ लेखकांच्या विविध विषयांवरील वैविध्यपूर्ण लेखनाने महाराष्ट्राची साहित्यसृष्टी संपन्न झाली आहे. या भूमीने आपल्याला अनेक महान लेखक दिले. त्याचबरोबर उत्तम वाचनाचीही परंपरा महाराष्ट्राने नेहेमीच जपली. परंतु, जसा काळ बदलत चालला तशी ही वाचन संस्कृती लोप पावते आहे अशी ओरड हल्ली अनेकदा ऐकू येताना दिसते. झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या या युगात ही वाचनसंस्कृती जपणे आपल्याच  हातात आहे. 

आजच्या तरुणाईच्या हातात स्मार्टफोन, अत्याधुनिक उपकरणे आहेत. हे तंत्रज्ञानआपल्याला प्रगतीकडे घेऊन जातेच, परंतु हातातील पुस्तक मानवाला प्रगल्भ व सुसंस्कृत बनवते. ज्ञानार्जनासाठी सर्वात सोपा व उत्तम मार्ग म्हणजे वाचन होय. वाचन जेवढे अधिक तेवढा माणूस समृद्ध होत जातो. युवा पिढीने दिवसभरातील काही वेळ वाचनासाठी अवश्य राखून ठेवायला हवा. 

पुस्तके, त्यातील विचारमाहितीज्ञान यांवर चर्चा व्हावयास हव्यात. याद्वारे मानवाचा बौद्धिक विकासही होत जातो. वाचनसंस्कृती जपण्यासाठी आणि वाढविण्यासाठी मोठा हातभार लावतात ती वाचनालये. एकाच जागी सर्व प्रकारच्या पुस्तकांचा मोठा संग्रह वाचकांची वाचनाची तहान भागवितो. आज इंगळगी, दक्षिण सोलापूर येथील सार्वजनिक वाचनालयास दिलेल्या सदिच्छा भेटीनंतर हे पुन्हा एकवार प्रकर्षाने जाणवले. अधिकाधिक नागरिकांनी या वाचनालयांचा लाभ घेत वाचनाची आवड जपावी, वाढवावी व इतरांनाही वाचनासाठी प्रोत्साहन द्यावे.


आपला नम्र,