महिला सबलीकरण, सक्षमीकरण, समाजात बरोबरीचे स्थान, स्वातंत्र्य....

गेल्या काही वर्षात आपल्या भारत देशात अनेक नवीन बदल घडून येऊ लागले. शिक्षण, उद्योग, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात वेगाने विकास घडून येऊ लागला. या विकासात महिलांचे स्थानही विशेष महत्वाचे राहिले आहे. अगोदर घरचा उंबरठाही न ओलांडू शकणाऱ्या स्त्रीया शिकू लागल्या. स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या त्या सर्व थोर समाजसुधारकांचे यासाठी आपण ऋणी राहावयास हवे. शिक्षण आपल्याला सुसंस्कृत व समृद्ध बनविते. असे म्हणतात की, एक स्त्री शिकली तर संपूर्ण घर शिकते. स्त्री नेहेमी स्वतःच्या प्रगती बरोबरच आपल्या कुटुंबाच्या प्रगतीचाही विचार करत असते. स्त्री शिक्षण आणि स्त्रियांना समाजात मिळू लागलेले मानाचे स्थान हे चित्र निश्चितच आशादायी आहे. 

२१ व्या शतकातील आजच्या समाजाकडे पाहिले असता स्त्रिया सर्वच क्षेत्रात आघाडीवर असल्याचे दिसून येते. शैक्षणिक क्षेत्र असो वा औद्योगिक, नोकरी असो वा क्रीडा क्षेत्र, विज्ञान असो वा साहित्य, सर्व ठिकाणी महिलांनी मोठी आघाडी घेतल्याचे पाहावयास मिळते. सोशीकता, कष्ट घेण्याची वृत्ती, जिद्द, समजूतदारपणा असे अनेक गुण निसर्गतःच स्त्रियांमध्ये असतात. आपल्या गुणांना पारखून त्यांच्या जोरावर स्त्रिया प्रगतीची शिखरे काबिज करत आहेत.

महिला सबलीकरण, सक्षमीकरण, समाजात बरोबरीचे स्थान, स्वातंत्र्य हे शब्द आपण नेहेमीच ऐकतो. याबद्दल अनेक ठिकाणी लिहिले गेले आहे, अनेक चर्चाही या विषयावर घडत असतात. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने विविध पावले उचलली गेलेली आपल्याला दिसून येतात. स्त्रियांना आर्थिक, शैक्षणिक पाठबळ मिळवून देणाऱ्या संस्था, स्त्रियांसाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे हक्क, त्यांचे प्रश्न यांसाठी काम करणाऱ्या संस्था आपल्याला दिसून येतात. 

परंतु, दुर्दैवाने आजही आपल्या समाजात अनेक स्त्रियांना निर्णय स्वातंत्र्य नसल्याचे चित्र समोर येत आहे. शिक्षण किती व कोणते घ्यावे, नोकरी करावी की व्यवसाय यांसारख्या प्रश्नांपासून विवाहाचा निर्णय देखील स्त्रियांवर लादला जाताना दिसतो. आज समाजातील सुशिक्षित व सुसंस्कृत कुटुंबांमधून हे चित्र काही अंशी बदलताना दिसते खरे, परंतु अनेक घरात स्त्रियांना, मुलींना निर्णय स्वातंत्र्य मिळत नाही हे दुर्दैवी वास्तव आहे. निर्णय स्वातंत्र्य आणि आपल्या कुटुंबाचा सबळ पाठिंबा या दोन महत्वाच्या बाबी स्त्रियांना यशाकडे घेऊन जाण्यास महत्वाच्या ठरतील. यासाठी समाजाच्या सर्व स्तरांमधून प्रयत्न होणे गरजेचे आहे. शिक्षण, नोकरी - व्यवसाय, क्रीडा, राजकारण, तंत्रज्ञान, विज्ञान, साहित्य या व अशा सर्व क्षेत्रात जाऊ पाहणाऱ्या आपल्या कुटुंबातील स्त्रियांना प्रोत्साहन द्यावयास हवे. 

विकसित देश म्हणून उदयाला येण्यासाठी आपल्या भारताची घोडदौड सुरू आहेच. जेव्हा जाती धर्म आणि लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन सर्व समाज एकत्र येईल तेव्हा या प्रगतीला वेग प्राप्त होईल.

आपला नम्र,