आज काही शेतकऱ्यांशी व गावकऱ्यांशी या संदर्भात भेट व चर्चा झाली. त्या निमित्ताने.

भूसंपादन तसा भावनिक मुद्दा आहे. स्वतःची जमीन कुठल्याही कारणासाठी हस्तांतरित करणे यासाठी मनाची तयारी करणे कुणालाही कठीण जाते हे सत्य आहे. परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्याचा विचार आपण भावनांच्या पलीकडे जाऊन करायला हवा.

भावनांपेक्षा महत्वाचे काय असा जर प्रश्न असेल तर त्याला एक उत्तर सर्वानाच मान्य असेल ते म्हणजे आपल्या मुलांचे भविष्य. यापुढे आपणासाठी महत्वाचे काही नाही. आपली मुले ही फक्त आपले नाही तर या जिल्ह्याचे, या देशाचे भविष्य आहेत. त्यांना एक सक्षम, स्थिर भविष्य देणे ही आपली आणि फक्त आपलीच जबाबदारी आहे.

पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता गरज आहे ती रोजगाराची. सदर MIDC च्या माध्यमातून अशाच उत्तम रोजगाराच्या संधी मंद्रुप व पर्यायाने सोलापूर जिल्ह्यात तयार होणार आहेत. सोलापूर ग्रामीण भागासाठी ही एक सुवर्ण संधी म्हणायला हवी. नवीन पिढीला नानाविध क्षेत्रांमध्ये काम करून स्वतःचे ज्ञान अनुभव वाढवण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

नोकरीसाठी म्हणून आज आपल्यापासून लांब जाऊन राहावं लागत असलेली आपली मुले आपल्या जवळ राहणार आहेत. विभक्त कुटुंबात लहानाची मोठी होणारी नातवंडे आता इथे त्यांच्या आजी आजोबांच्या प्रेमाच्या सावलीत वाढू शकणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यात उत्त्पन्न निर्माण होऊन ते इथेच इथल्या मातीसाठी वापरले जाऊ शकणार आहे. वैयक्तिक स्वार्थाच्या व वैयक्तिक भावनांच्या पुढे जाऊन प्रत्येकाने सोलापूरजिल्ह्याच्या विकासासाठी, प्रगतीसाठी एकत्र येऊन आता पाऊल टाकण्याची गरज आहे. मंद्रुप MIDC हे त्यातील महत्वाचे पाऊल ठरेल. भविष्यात मंद्रुप हे एक उद्योगनगरी म्हणून घडू शकेल ज्याची ही सुरुवात ठरेल.

चांगल्या रोजगाराच्या माध्यमातूनच भविष्यातील स्वप्ने व आपल्या स्वप्नातील भारत घडणार आहे. मी या दृष्टीने कार्य करण्यासाठी कायमच वचनबद्ध राहिलो आहे. आणि यापुढेही कायमच राहीन.

आपला नम्र,