मानवी जीवनास अक्षरशः वरदान ठरलेला विजेचा दिवा, ग्रामोफोन यांसह अनेक विद्युत उपकरणांचा शोध लावणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे थॉमस अल्वा एडिसन. चिकाटी, मेहनत, निष्ठेने कार्यरत राहण्याची वृत्ती आपण अंगिकारली तर यश प्राप्त होतेच, हे त्यांच्या चरित्रामधून आपणास शिकावायस मिळते. दिव्याचा शोध लावून एडिसन यांनी मानवी जीवनात प्रकाश आणला, आता आपल्यापुढे लक्ष्य आहे प्रत्येक गावात, प्रत्येक घरात वीज पोहोचविण्याचे. तेव्हाच मानवी जीवन खऱ्या अर्थाने प्रकाशमान होईल. 

माणसाच्या अंगी असणाऱ्या गुणांना जेव्हा मेहनतीची जोड मिळते तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ लागतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे एडिसन. त्यांच्याविषयी जेवढे अधिक वाचन आपण करत जातो तेवढा त्यांच्या कर्तृत्वाचा आवाका पाहून थक्क व्हावयास होते. निर्बुद्ध विद्यार्थी म्हणून शाळेतून काढून टाकल्यानंतरही त्यांचे शिक्षण थांबले नाही, तर अधिक चिकाटीने ते सुरूच राहिले व याच चिकाटीमधून हा प्रवासाने त्यांना टेलिग्राफ इंजिनिअर बनविले. घरात बनविलेल्या त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये विजेचा दिवा, ग्रामोफोन, प्रोजेक्टर यांच्यासह कित्येक महत्वपूर्ण शोध त्यांनी लावले. लहान मोठी कामे करीत त्यांनी आपल्या कामासाठी पैसा उभा केला. अत्यंत बिकट परिस्थितीतही नेटाने कार्यरत राहण्याची शिकवण याद्वारे आपल्याला मिळत राहते. हे गुण विद्यार्थ्यानी अवश्य आत्मसात करावेत असेच आहेत. या कठीण प्रवासात त्यांना भक्कम पाठिंबा लाभला तो त्यांच्या पालकांचा. आपल्या मुलांच्या अंगी असणाऱ्या गुणांना प्रोत्साहन देण्याचे काम सर्वप्रथम आईवडिलांकडूनच तर होत असते. आपल्या मातीतही असे अनेक संशोधक, अभ्यासक तयार व्हावेत, यासाठी घरातून भक्कम आधार मिळणे हे अतिशय आवश्यक आहे. विद्यार्थी, पालक अथवा संपूर्ण समाज, अशा सर्वच भूमिकांमधे आपल्याला प्रेरणा देणाऱ्या थॉमस अल्वा एडिसन यांना आज जन्मदिवसाच्या निमित्ताने मानवंदना.

आपला नम्र,