शिक्षण - प्रगतीचा पाया....

शाळा - विकासाचे मंदिर...

महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयन प्राचार्य महासंघाचे 38 वे राज्यस्तरीय अधिवेशन, पंढरपूर येथे आज भेट देण्याचा योग आला.
तेथे शिक्षण क्षेत्रातील अनेक ज्ञानी दिग्गजांची भेट घडून अली.

त्यांच्याशी बोलताना त्यांची त्यांच्या कार्याबद्दल असलेली आत्मीयता जाणवत होती. 
जवळपास ग्रामीण भागातून शालेय शिक्षण घेतलेले सर्वच कुलगुरू, प्राचार्य, शिक्षक हे सर्व त्यांच्या त्यांच्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेले आहेत. आताच्या बदलत्या काळात वाढत्या खाजगी इंग्लिश माध्यमांच्या शाळांच्या प्रभावाखाली मराठी जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था फारच बिकट झाली आहे हे एक दुर्दैवी सत्य आहे. या शाळांचा कायापालट करण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने किमान आपल्या शाळेची जबाबदारी उचलली तर गावातील लोकांच्या जन सहभागातून खूप मोठा बदल घडू शकेल असे माझे मत आहे.
मला असे वाटते की सर्व शिक्षण संस्थांनी व शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्यानी आर्थिकदृष्ट्या पिछाडलेल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने त्यांच्या पातळीवर एक मोहीम सुरू करायला हवी.
मी नेहमीच सांगत आलो आहे, कुठल्याही देशाचा विकास हा व्यक्तीच्या विचारातून होत असतो. आपण आपल्या विचारातून आपल्या घराचा, गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा आणि मग पर्यायाने देशाचा विकास घडवत असतो. जर सर्वांनी आपल्या गावातील शाळेचे ज्या शाळेने आपल्याला घडवले त्या शाळेचे रूप बदलायचा निर्णय घेतला तर हे सहजी शक्य आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा उत्तम रित्या चालू लागल्या तर मोफत आणि उत्तम शिक्षण सर्व घटकांपर्यंत पोचू शकेल. आपल्या नात्यातील, गावातील एका गरजू विद्यार्थ्यांची शिक्षणाची जबाबदारी घेतली, असा वसा आपण सोडला तर पुढील काही वर्षात इच्छा असलेला पण आर्थिक दुर्बल असलेला एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही.
यात शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्ती जर पुढे आल्या तर त्या विद्यार्थ्याला योग्य शिक्षण घेण्याच्या दृष्टीने चांगले मार्गदर्शन पण मिळू शकेल. पदवीपुरते शिक्षण ना घेता त्यातून भविष्यासाठी रोजगार निर्मितीच्या दृष्टीने काय मार्ग निघू शकतील याचे मार्गदर्शन या पिढीला शिक्षण क्षेत्रातील लोक उत्तमरीत्या करू शकतील असे मला वाटते. शिक्षणाच्या शाखांमधे वाढत्या डिजिटल माध्यमांचा कसा वापर करता येईल याचा विचार यांनी करून त्यादृष्टीने नवे विषय सुरु करण्याच्या दृष्टीने पुढे यायला हवे जेणेकरून भविष्यात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी भारतातील मुलांना मिळू शकतील.
पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने सर्व प्रयत्न करण्यासाठी मी व भारतीय जनता पक्ष सदैव प्रयत्नशील आहोत. आपल्या साथीने हे ध्येय सहज शक्य होईल.

आपला नम्र,